डोंबिवलीमध्ये एका हत्येप्रकरणी तब्बल ३ वर्षांनी आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या रिक्षाचालक हत्येप्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीला अखेर विष्णुनगर पोलिसांनी अटक कऱण्यात आलीये. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी शेतमजुराचा वेष धारण करून पाच दिवस सापळा रचला होता. नांदेडमधून त्याला जेरबंद करण्यात आलंय.
डोंबिवलीतील देवीचा पाडा खाडी किनारी सोमनाथ शिंदे या रिक्षाचालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. ही घटना दारू पार्टीदरम्यान घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी विलन ठावरे आणि योगेश डोंगरे या दोन आरोपींना अटक केली होती. या हत्येचा मुख्य आरोपी दीपक करकरडे हा तेव्हापासून फरार होता.
गेल्या तीन वर्षांपासून करकरडेचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. त्याच्याकडे कोणतंही ओळखपत्र नव्हतं आणि तो मोबाईलचाही वापर करत नव्हता. त्यामुळे पोलिसांसाठी त्याचा शोध घेणं मोठं आव्हान बनलं होतं. तरीही पोलिसांनी सातत्याने तपास सुरू ठेवला.
कल्याण विभागाचे डीसीपी अतुल झेंडे, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे आणि अधिकारी जी. गमे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकं तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपी नांदेडमध्ये शेतमजूर म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर पोलिसांचे पथक नांदेडमध्ये पोहोचले. स्थानिकांमध्ये सहज मिसळता यावं म्हणून पोलिसांनी स्वतः शेतमजुराचा वेष घेतला. तब्बल पाच दिवस ते परिसरात राहून आरोपीवर लक्ष ठेवत होते. अखेर दीपक करकरडे याची खात्री पटताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२३ मध्ये हा खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला खाडीकिनारी एक बेवारस मृतदेह सापडला होता. तपासादरम्यान मृताची ओळख पटवण्यात आली आणि पुढे दोन आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीतून मुख्य आरोपीची माहिती मिळाली होती.
मृत आणि आरोपी एकमेकांचे मित्र होते. दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचं तपासात समोर आलंय. या कारवाईमुळे तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरण सोडवण्यास मदत झालीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.