नितीन पाटणकर, सचिन जाधव, पुणे
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग आणि धर्मादाय सहआयुक्तांच्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. डॉ. सुश्रुत घैसास हे दोषी असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून, त्यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. घैसास यांच्याविरोधात दोन दिवसांत कारवाईची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आरोग्य विभाग आणि धर्मदाय सहआयुक्तांच्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. या प्रकरणात या समित्यांचे दोन्ही अहवाल सरकारकडे सोपवण्यात आले आहेत.
या दोन्ही अहवालांमध्ये डॉ. घैसास हे दोषी असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई होणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले. घैसास यांनी राजीनामा दिल्यानंतर आता शासन कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहेत.
महिला आयोगाकडून गंभीर दखल
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला. मृत तनिषा आणि भिसे कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजनिक केल्याने मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्याची आयोगाने गंभीर दखल घेतली.
आयोगाने याप्रकरणी पोलीस आयुक्त, पुणे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या अध्यक्षांना यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल आयोगाला तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत एक्सवर पोस्टद्वारे माहिती दिली.
दीनानाथ रुग्णालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात संतापाची लाट पसरली आहे. विविध राजकीय पक्षांनी रुग्णालयाच्या कारभाराविरोधात आंदोलन केलं होते. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी रुग्णालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. दीनानाथ हॉस्पिटल परिसरात रुग्णांच्या नातेवाइकांशिवाय इतर व्यक्तींना एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे.
दीनानाथ हॉस्पिटल परिसरात दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका चालक यांच्यासाठी लागू नसणार आहे. रुग्णालय परिसरात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. रुग्णालय परिसरात छापील मजकूर लिहिण्यास आणि चिकटवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कुठला वाद निर्माण होईल असा कुठलाही मजकूर लावता कामा नये, असेही आदेशात म्हटले आहे. रुग्णालयाबाहेर कोणीही आंदोलने किंवा भाषणबाजी करू नये, या सर्व गोष्टी विचारात घेता हे प्रतिबंधात्मक आदेश पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी जारी केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.