रायगडच्या कर्जतमध्ये महिलेची छेड काढल्याची संतापजनक घटना
कर्जत जकात नाक्याजवळील रेल्वे पुलावर ही घटना घडली
महिला आपल्या बहिणीसोबत बाजारातून घरी जात असताना दोघांनी पाठलाग केला
पोलिस आणि त्याच्या सहकाऱ्याने महिलेची भररस्त्यात छेड काढली
महिलेच्या बहिणीने घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला
रायगडच्या कर्जतमध्ये पोलिसाने महिलेची छेड काढल्याची संतापजनक घटना घडली. कर्जत जकात नाका येथील रेल्वे स्टेशनच्या पुलावर ही घटना घडली. भररस्त्यामध्ये पोलिस आणि त्याच्या साथीदाराने महिलेची छेड काढली. या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसासह त्याच्या साथीदाराविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी पोलिस असल्यामुळे तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली जात होती. संतप्त ग्रामस्थांनी मध्यरात्री पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर आणि ग्रामस्थांच्या तीव्र दबावानंतर मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास पोलिस आणि त्याच्या सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९:३० वाजता तक्रारदार महिला आपल्या बहिणीसोबत कर्जत बाजारातून गुंडगे येथील आपल्या घरी परत जात होती. कर्जत जकात नाक्याजवळील रेल्वे पुलावरून जात असताना मागून आलेल्या २ मद्यधुंद व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला. त्यातील एकाने "चल येते का चल" असे म्हणत महिलेची छेड काढली. त्यानंतर महिलेच्या नवऱ्याने घटनास्थळी धाव घेत आरोपींना विचारणा केली असता छेडछाड करणारा एक व्यक्ती हा पोलिस कर्मचारी प्रमोद मारोती पाटील आणि त्याचा साथीदार महेंद्र भगवान भंडारे असल्याचे समोर आले.
या घटनेचा व्हिडिओ महिलेच्या बहिणीने मोबाईलमध्ये शूट केला असता पोलिस कर्मचाऱ्याने तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित महिला आणि तिचे नातेवाईक तक्रार देण्यासाठी कर्जत पोलिस ठाण्यात गेले. पण आरोपी पोलिस दलातीलच असल्याने सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या घटनेची माहिती मिळताच सुमारे २० ते ३० गावकरी पोलिस ठाण्यात जमा झाले आणि त्यांनी कारवाईसाठी पोलिसांवर दबाव आणला.
ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. अखेर ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास प्रमोद मारोती पाटील आणि महेंद्र भगवान भंडारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ७५(३), ७८ आणि ७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक करत आहेत. महिलेची छेड काढणारा आरोपी पोलिस असल्यामुळे या घटनेची कर्जतमध्ये चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.