संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
IAS अधिकारी होण्याचं स्वप्न, UPSC परीक्षेची तयारी आणि देशातील लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' (KBC) मध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न... मात्र, या सगळ्यामध्ये आलेल्या अपयशामुळे आणि व्यवसायातील नुकसानीमुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका बीटेक पदवीधराने चक्क चोरीचा मार्ग निवडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कांदिवली पश्चिम येथील 'पद्मावती ज्वेलर्स'मधून सुमारे पाच लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरून फरार झालेल्या ४२ वर्षीय आरोपीला कांदिवली पोलिसांनी दिल्लीतून बेड्या ठोकल्या आहेत. सतीश कुमार कृष्णप्रसाद केसरी असे या आरोपीचे नाव आहे.
पार्श्वभूमी आणि अपयशाची मालिका:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा बिहारचा असलेला सतीश कुमार हा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक पदवीधर आहे. आयएएस अधिकारी होण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी तो दिल्लीतील उत्तम नगर येथे राहून यूपीएससीची तयारी करत होता. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी तो पार्टटाइम नोकऱ्याही करायचा, पण अनेक प्रयत्न करूनही त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्येही नशीब आजमावले, मात्र 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट'च्या पुढे त्याला मजल मारता आली नाही.
व्यवसायात नुकसान अन् चोरीचा कट:
शैक्षणिक व टीव्ही शोमधील अपयशानंतर सतीशने पत्नीच्या मदतीने टूर अँड ट्रॅव्हल व्यवसाय सुरू केला. यासाठी त्याने कर्ज काढून चार-पाच गाड्या खरेदी केल्या आणि त्या ओला-उबरमध्ये चालवल्या. मात्र, व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने त्याच्यावर कर्जाचा डोंगर জমला. कर्ज फेडण्यासाठी त्याने वेगवेगळ्या शहरांतील नामांकित ज्वेलर्सना लक्ष्य करण्याचा कट रचला. ग्राहक बनून दुकानात जायचे, दागिने पाहण्याच्या बहाण्याने हातसफाई करायची आणि पसार व्हायचे, ही त्याची मोडस ऑपरेंडी होती.
कांदिवलीत असा दिला दरोड्याला अंजाम:
याच योजनेनुसार, १५ नोव्हेंबर रोजी सतीश कांदिवली पश्चिम येथील 'पद्मावती ज्वेलर्स'मध्ये ग्राहक म्हणून गेला. त्याने कर्मचाऱ्यांकडे ४३.२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी पाहण्यासाठी मागितली. दागिने पाहत असताना संधी साधून तो सुमारे पाच लाख रुपयांची सोनसाखळी घेऊन दुकानातून पसार झाला. चोरीनंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने मुंबईतील एका हॉस्टेलमध्ये बनावट ओळखपत्र दिले आणि मोबाईल बंद करून तो दिल्लीला पळून गेला.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून छडा:
दुकानदाराच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा मोबाईल नंबर ट्रॅक केला आणि दिल्लीत धाड टाकून सतीश कुमारला जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीला गेलेली सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत त्याने कांदिवलीतील गुन्ह्याची कबुली दिली असून, दिंडोशी परिसरातील अशाच एका गुन्ह्याचाही उलगडा झाला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याने इतर शहरांतही अशा चोऱ्या केल्या आहेत का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.