वैदेही कानेकर, मुंबई
Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. निवडणुकांची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून जागा वाटपाच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. दुसरीकडे विधानसभेच्या प्रचारासाठीही राज्यातील प्रमुख पक्षांनी जोरदार रणनिती आखली आहे. याच संदर्भात आता एक महत्वाची बातमी समोर आली असून दादरमधील शिवाजी पार्कवर सांगता सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. मनसे, शिवसेना ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपने एकाच दिवशी जागेसाठी अर्ज केल्याने नवा पेच उभा राहिला आहे.
महाराष्ट्रामध्ये २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकालाचा गुलाल उधळला जाणार आहे. त्याआधी राज्यात प्रचाराचा धुरळा पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रभर प्रचाराचा धुरळा उडवण्यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीसह इतर पक्षांनीही जोरदार रणनिती आखली आहे. अशातच आता सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.
शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी मनसे, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार चुरस रंगली आहे. १७ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर सभा घेण्याच्या परवानगीसाठी या चारही पक्षांनी अर्ज केलेत. एकाच दिवशी चार पक्षांनी अर्ज केल्याने आता सभा नेमकी कोण घेणार? परवानगी कोणाला द्यायची? असा प्रश्न पालिका प्रशासनापुढे पडला आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार पहिला अर्ज दाखल करणाऱ्याला मैदान मिळण्याबाबत प्राधान्य दिले जाणार आहे. या नियमानुसार मनसेनं प्रथम अर्ज केल्यामुळे मनसेला शिवाजी पार्क मैदान मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, १५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत तर ४ नोव्हेंबर ही अर्ज माघार घेण्याची तारीख आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी २८८ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकालाचा गुलाल उधळला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.