अंबरनाथमध्ये संतापजनक घटना घडली आहे. एका स्त्री जातीच्या नवजात बाळाला इमारतीतून फेकून देण्यात आले. अंबरनाथ पश्चिमच्या शंकर हाईट्समध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बाळाची आई आणि आजीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाईट्स फेज - २ मधील डी विंगमध्ये ही घटना घडली. या इमारतीत महिला तिच्या आईसह वास्तव्याला होती. रात्रीच्या सुमारास तिने घरातच स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर बाथरूममधून इमारतीच्या डक्टमध्ये बाळाला फेकून दिलं. सकाळच्या सुमारास ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर उमेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केलं.
अंबरनाथ शहरात घडलेली ही घटना संतापजनक आणि लाजिरवाणी घटना असल्याची प्रतिक्रिया स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवला. तर या बाळाची आई आणि आजी या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. संबंधित महिला ही अविवाहित असून लग्नापूर्वी जन्माला आलेलं हे बाळ नको असल्यानेच त्याला फेकून दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
तर, 'एक नवजात बाळासंदर्भातील माहिती सकाळी येथील नागरिकांना समजली. मी लगेच इथे पोहोचलो. वरून फेकण्यात आलं की आणून ठेवलं हे माहीत नाही, पण ते नवजात बाळ मृत पावले आहे. बाळ स्त्री जातीचं आहे. ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. संबंधित संशयित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.', असे माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.