रोहिदास घाडगे, खेड प्रतिनिधी
Pune Khed Zilla Parishad Voting : पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी सात वाजताना मतदाना सुरूवात होणार आहे. पण त्याआधीच पुण्यातील खेडमध्ये मध्यरात्री प्रचंड राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आंबेठाण पाईट जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या नवऱ्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये शरद बुट्टे पाटील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बुट्टे पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो लोक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. (Ajit Pawar NCP candidate husband attacked in Pune)
पुण्याच्या खेड तालुक्यातील आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या यजमानावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शरद बुट्टे पाटील यांनी काही दिवसापूर्वीच भाजपातून अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या हल्ल्यात माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी गटनेते शरद बुट्टे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी वासुली फाटा येथील बालाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
शरद बुट्टे हे आपल्या खासगी कामानिमित्त बाहेर गेले असता दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जात असून, हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
शरद बुट्टे यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी डॉक्टरांचे पथक सतत लक्ष ठेवून आहे. दरम्यान, या घटनेनंतर आंबेठाण पाईट परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. .जुन्या वादातून किंवा राजकीय कारणातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद निवडणूक काळात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.