साक्षी यादव, साम टीव्ही
मुंबई: सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आल्याचा आरोप असलेल्या 20 वर्षीय तरुणाला केरळ पोलिसांनी अटक केली आहे. यश सिंह असे अटक करण्यात आलेल्या तरुणांचे नाव असून, तो नवी मुंबईतील एरोली परिसरात राहत असल्याची माहिती आहे. नवी मुंबई ATS ने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केरळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या महितीनुसार, यश सिंह सोशल मीडिया हँडलर्सच्या संपर्कात होता.त्याने मुंबईतील कुलाबा परिसरात असलेल्या चाबाद हाऊसची रेकी केल्याचा आरोप आहे. तसेच ज्यू नागरिकांची शिबिरे, छायाचित्रे, वाहने आणि लोकेशन यांची माहिती गोळा केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. ही संवेदनशील माहिती दहशतवादी हँडलर्सना पाठवण्यात आल्याचा आरोप ही त्याच्यावर करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, रेकी करण्याच्या बदल्यात त्याने आर्थिक मोबदला स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी केरळमधील त्रिशूर ईस्ट पोलीस ठाण्यात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई एटीएस आणि केरळ पोलिसांनी संयुक्त तपास करत ही कारवाई केली.
दरम्यान, Telegram, Instagram आणि WhatsApp यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढले जात असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर एटीएसने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तींना संवेदनशील ठिकाणांचे फोटो, व्हिडिओ किंवा लोकेशन शेअर करू नका, असे आवाहन तपास यंत्रणांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच तरुणाचे आंतरराष्ट्रीय हँडलर्सशी नेमके काय संबंध होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.