दिवाळीनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये वायुप्रदूषणात वाढ झाली
गाझियाबादमध्ये ५३६, नोएडामध्ये ५०८ तर नवी दिल्लीत ४७४ AQI नोंदवण्यात आला
मुंबईतही हवेची गुणवत्ता खराब असून पुणे आणि हैदराबादमध्ये प्रदूषणाची चिंता वाढली
देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. गुरुवारीही अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता खराब ते धोकादायक पातळीवर नोंदवण्यात आली. विशेषतः दिल्ली आणि आसपासच्या परिसरात प्रदूषणाने चिंताजनक पातळी गाठली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यात तसेच गाझियाबाद, नोएडा आणि नवी दिल्ली येथील हवा आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे.
महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली असून दुसरीकडे लक्ष्मीपूजनानंतर मुंबई, पुण्यासह सगळीकडे फटाक्यांच्या अताषबाजीमुळे हवामान प्रदूषित झाले आहे. मुंबईत गुरुवारी १५४ AQI नोंदवण्यात आला. त्यामुळे मुंबईचा समावेश खराब हवेच्या श्रेणीत झाला. तर पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात हवेची गुणवत्ता खालावली असून जगातील प्रदूषित शहरांमध्ये पुणे ३४व्या स्थानी असल्याचे निदर्शनास आले. यामुळे स्थानिक नागरिकांना आजारांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
गुरुवारी गाझियाबादमध्ये सर्वाधिक ५३६ AQI नोंदवण्यात आला. यामुळे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत गाझियाबादचा दहावा क्रमांक लागला. नोएडामध्येही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक ५०८ वर पोहोचला. तर नवी दिल्लीत ४७४ AQI नोंदवण्यात आला.
या दोन्ही शहरांमधील हवा अत्यंत खराब स्थितीत होती. जागतिक प्रदूषित शहरांच्या यादीत नोएडाचा १४ वा, तर नवी दिल्लीचा २१ वा क्रमांक होता. या शहरांमध्ये धुराचे प्रमाण अधिक होते. तसेच वाऱ्याचा वेग ताशी केवळ ४.३ ते ५ किलोमीटर असल्याने प्रदूषित हवा एका ठिकाणी साचून राहत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.