corona  
मुंबई/पुणे

कोविड प्रतिबंधात्मक नियम मोडणाऱ्या हॉटेल, उपहारगृहांवर होणार कठोर कारवाई!

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका मुख्यालयात महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत घेतली आढावा बैठक

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ओमायक्रॉन या कोविड विषाणूच्या प्रसारासह एकूणच कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढीस लागल्याने राज्य सरकार अतिदक्ष झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक २९ डिसेंबर २०२१) आढावा बैठक घेतली. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी देखील महानगरपालिका प्रशासनाची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेवून विविध निर्देश दिले आहेत. प्रामुख्याने नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱयांवर प्रशासनाची करडी नजर राहणार असून त्यादृष्टिने विविध सूचना देण्यात आल्या आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड बाधितांच्या संख्येत मागील आठवडाभरात वेगाने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे हे आज सकाळी महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठकीसाठी दाखल झाले. महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांची या बैठकीस उपस्थिती होती.

ही बैठक आटोपताच महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनाची तातडीची बैठक घेतली. सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, इतर वैद्यकीय व संबंधित खात्यांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल म्हणाले की, ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वेगाने होत असून एकूणच कोविड बाधित रुग्णांची संख्याही जलदगतीने वाढत आहे. केंद्र व राज्य सरकारने सावधानतेचा इशारा दिल्यानंतर नव्याने कोविड प्रतिबंधात्मक निर्देश देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोविडच्या संभाव्य तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली असून खासगी रुग्णालये देखील सुसज्ज होत आहेत. प्रशासनाने रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने सर्वत्र गर्दी रोखण्यावर जोर दिला आहे. विशेषतः लग्न सोहळ्यांवर आणि नववर्ष स्वागत कार्यक्रमांवर निर्बंध आणले असले तरी मागील आठवडाभरात रुग्णसंख्या वेगाने वाढली असून ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे दक्षता म्हणून काही बाबी प्राधान्याने करावयाच्या आहेत, असे सांगून डॉ. चहल यांनी निर्देश दिले. ते पुढीलप्रमाणेः

• नववर्ष स्वागताचे कार्यक्रम / समारंभ / पार्टी आयोजित न करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. हॉटेल्स्, उपहारगृहं यांच्यासह विविध आस्थापनांना उपस्थितीच्या मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्याचे योग्यरीतीने पालन होते आहे, यावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांनी तातडीने भरारी पथकांची नेमणूक करावी. स्थानिक पोलीस उपायुक्तांशी समन्वय साधून या पथकांमध्ये पोलीस कर्मचाऱयांचा देखील समावेश करावा.

• नववर्ष स्वागत प्रतिबंधात्मक आदेश तसेच कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन करताना आढळणाऱया हॉटेल्स्, उपहारगृहांवर सक्त कारवाई करावी.

• सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या अखत्यारितील हॉटेल्स्, उपहारगृहं यांचे दैनंदिन फुटेज तपासून उपस्थितीचे नियम पाळले जात असल्याची खातरजमा करावी.

• मालाड येथील कोविड उपचार केंद्र हे लहान मुलांवर उपचारांसाठी महत्त्वाचे आहे. या केंद्रासह कांजूरमार्ग येथे उभारलेले कोविड उपचार केंद्र देखील लवकरात लवकर कार्यान्वित करावे.

• दुबईमधून येणाऱया आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांना सक्तीने सात दिवस गृह विलगीकरण करण्याचे निर्देश व त्याअनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत महानगरपालिका प्रशासनाने दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी आदेश दिले आहेत. या आदेशांमध्ये आता फक्त दुबईऐवजी संपूर्ण संयुक्त अरब अमिराती देशांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच संयुक्त अरब अमिराती (यूएई) देशांमधून मुंबईत येणाऱया प्रत्येक प्रवाशाला विमानतळावर आगमनप्रसंगी आरटीपीसीआर (ऑन अरायव्हल टेस्टींग) चाचणी करावी लागेल. या चाचणीच्या अहवालासापेक्ष व प्रचलित नियमानुसार संबंधित प्रवाशांचे विलगीकरण ठरविण्यात येईल.

• हवाईमार्गे मुंबईत येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांमधून, ज्या बाधितांना लक्षणे नाहीत (एसिम्प्टोमॅटिक) आणि औषधोपचाराची देखील गरज भासत नाही, अशा रुग्णांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल व गोरेगावातील नेस्को या दोन्ही कोविड उपचार केंद्रामध्ये प्रत्येकी ५०० रूग्णशय्यांची स्वतंत्र विलगीकरण व्यवस्था कार्यान्वित करावी. अशा एसिम्प्टोमॅटिक रुग्णांना तेथे निशुल्क विलगीकरणात राहता येईल. जे रुग्ण सशुल्क विलगीकरण व्यवस्थेसाठी तयार असतील, त्यांना निर्देशित हॉटेल्स् मध्ये राहण्याची परवानगी देण्यात येईल. या उपाययोजनेमुळे रुग्णालयांमधील रुग्णशय्या विनाकारण अडकून राहणार नाहीत व वैद्यकीय सेवेवरचा ताणदेखील कमी होईल.

• विमानतळावर, रॅपिड टेस्टमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांची नियमित आरटीपीसीआर चाचणी करावी. ती चाचणी निगेटिव्ह असेल तर प्रचलित नियमानुसार विलगीकरणाची कार्यवाही करावी. जर चाचणी पॉजिटिव्ह आली तर त्या रुग्णास प्रचलित नियमानुसार विलगीकरण अथवा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच नियमित आरटीपीसीआर चाचणीचेच नमुने जनुकीय सूत्रनिर्धारण तपासणी (जिनोम सिक्वेसिंग) साठी पाठवावे.

• प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये, कोविड बाधितांच्या विलगीकरणासाठी किमान ५०० व्यक्ती क्षमतेचे कोविड काळजी केंद्र (सीसीसी २) लवकरात लवकर कार्यान्वित करावेत.

• सर्व विभाग कार्यालयांमधील विभाग नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) मध्ये येत्या दोन महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर अतिरिक्त संख्येने नेमण्यात येणार आहेत. गृह विलगीकरणात राहत असलेल्या रुग्ण व व्यक्तींचा पाठपुरावा करण्यासह इतर वैद्यकीय सेवांसाठी या प्रशिक्षणार्थींच्या सेवा उपयोगात येतील.

• सर्व रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्रामधील मनुष्यबळ, संयंत्रे व इतर यंत्रणा, औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा कसे, याचा आढावा घेवून त्यामध्ये कमतरता राहणार नाही, याची खात्री करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT