बीड : कोरोनाचे नियम फक्त सामन्य नागरिकांनाच आहेत का? असा संतप्त सवाल बीडमधील नागरिक करत आहेत. एकीकडे राजकीय मेळावे, वाढदिवस, सभा, संमेलने बिनधास्तपणे कोरोनाचे नियम पायदळी तुडवून मोठ्या थाटामाटात साजरे होत आहेत. दुसरीकडे मात्र, बीडच्या माजलगावमध्ये आठवडी बाजारात भाजीपाला विकण्यासाठी बसू न दिल्यानं, शेतकऱ्यांना आपला भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ काही दिवसांपूर्वी आली. या दोन घटनांमुळे कोरोनाचे नियम फक्त सामान्यांनाच आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
हे देखील पहा :
बीड जिल्हात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा नवा उच्चांक गाठत असताना, राजकीय नेतेमंडळी मात्र नियम पाळत नसल्याचे दिसून आले. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीला उजाळा म्हणून बीडमध्ये वरद ग्रुपच्या वतीने, लोकनेते गोपीनाथराव मुंडे नगर उभे केले आहे. याचा लोकार्पण सोहळा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खा. प्रीतम मुंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमात भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे या दोघींच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
मात्र, या कार्यक्रमात कोरोना नियमांचा अक्षरशः फज्जा उडाला होता. या वेळी गर्दीमध्ये नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर देखील मास्क नव्हता. तर, दुरीकडे माजलगावमध्ये शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ निर्दयी प्रशासनाने आणली होती. राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमाप्रसंगी दिमतीला पोलीस प्रशासन उभे असते, त्यावेळी कोरोना नियम पायदळी तुडवले जातात. तरी देखील दुर्लक्ष केलं जातं ? मग फक्त आठवडी बाजारातील शेतकऱ्या विरोधातच प्रशासन हिटलरशाही का करते? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी उपस्थित केलाय. यामुळे हा कायदा फक्त सामान्य लोकांना आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.