वैदही काणेकर, साम प्रतिनिधी
Deepak Kesarkar News : शिंदे सरकारमधील शिवसेनेच्या दोन नेत्यांन फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळणार नसल्याचं समोर आलेय. तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदेंसोबत याबाबत चर्चा केल्याचं समजतेय. सुरूवातीला शिंदेंकडून या दोन नेत्यांची भेट नाकारण्यात आली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार दिपक केसरकर आणि तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. या दोघांचा पत्ता कट होऊ शकतो. शुक्रवारी पाच तास वर्षा बंगल्यावर थांबून ही एकनाथ शिंदे यांनी भेट दिली नसल्याने दोन्ही माजी मंत्र्यांना नाराज होऊन परतावे लागले होते. त्यानंतर रात्री दोन वाजता एकनाथ शिंदेंसोबत या दोन नेत्यांची भेट झाली. मात्र या दोन्ही नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.
रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी सागर बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शिवसेना नेत्यांनाही गर्दी केली होती. तानाजी सावंत, दीपकर केसरकर यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय शिवसेनेचे आमदार संजय राठोड आणि शिवसेनेचे मंत्री पदासाठी इच्छुक असलेले आमदार संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग करण्यात येत आहे. इच्छुकांची संख्या जास्त आहे, मंत्रिपदे कमी आहेत, त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढलेली आहे. शुक्रवारी रात्री अनेक इच्छुक शिंदेंच्या भेटीला दाखल झाले होते. यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दिपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल पहायला मिळेल अशी चर्चा आहे. नवीन चेहऱ्यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते. तर अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदोंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. रविवारी, नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. महायुतीमधील मंत्रिपदाचे वाटप पूर्ण झाले असून यादी दिल्लीमधील केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आले. मंत्रिमंडळ विस्तारासाठी एक दिवस बाकी असताना इच्छुक आमदार वर्षा आणि सागरचे उंबरठा झिजवताना पहायला मिळत आहेत.
शिवसेनेचे संभाव्य मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोनच्या प्रतीक्षेत आहेत. रविवारी नागपूरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणारे संभाव्य मंत्री अधिकृत फोनच्या प्रतिक्षेत आहेत. संभाव्य मंत्र्यांचे कुटुंबिय आणि प्रमुख पदाधिकारी नागपूरला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमधील वरिष्ठ आणि मंत्रिपदासाठी पात्र असलेल्या नेत्यांना दुपारी ३ नंतर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जाणार आहे. सहकुटुंब नागपूरला उपस्थित राहण्याचे आदेश दिले जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.