अमर घटारे, अमरावती प्रतिनिधी
ST bus truck accident on Daryapur Amravati road : दर्यापूर-अमरावती मार्गावर एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला. लखापूर फाटा ते आरळा फाटा दरम्यान एसटी बस आणि ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एसटी बसचे चालक, वाहक आणि ट्रकच्या चालकासह सुमारे ८ ते १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्यापूर-अमरावती मार्गावरून जात असताना लखापूर फाटा ते आरळा फाट्यादरम्यान एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ट्रकच्या ड्रायव्हरच्या केबिनचा पूर्णपणे चुराडा झाला आणि ट्रक चालकाचे पाय केबिनमध्येच अडकून पडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने ट्रकची काच फोडून अत्यंत शिताफीने चालकाला बाहेर काढले.
या अपघातामध्ये बसमधील अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर ८ ते १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, जखमींपैकी काही जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने आणि प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचाराची गरज असल्याने, त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन हॉस्पिटल) रेफर करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे. अपघातामुळे दर्यापूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली असून, या अपघाताचा पुढील तपास दर्यापूर पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.