Maharashtra politics latest news today : महाराष्ट्राच्या राजकारणात आजची रात्र अत्यंत वादळी आणि मोठ्या राजकीय घडामोडींची ठरण्याची शक्यता आहे. महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद आणि आगामी राजकीय रणनीतीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मुख्य उपस्थितीत महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर आज संध्याकाळी ७ वाजता या हायव्होल्टेज बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतर महायुतीच्या सर्व नेत्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
दोन्ही 'राष्ट्रवादी' एकत्र येणार? शरद पवार-जयंत पाटील बैठकीनंतर चर्चांना उधाण
रविवारी रात्री ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही 'राष्ट्रवादी' (अजित पवार गट आणि शरद पवार गट) पुन्हा एकत्र येण्याबाबत अतिशय महत्त्वाची चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर आणि त्याच्या महायुतीवर होणाऱ्या परिणामांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समन्वय समितीच्या बैठकीचा मुख्य अजेंडा काय?
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर महायुतीच्या घटकांमध्ये समन्वयाचा मोठा अभाव पाहायला मिळत आहे. याशिवाय अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबित असल्याने आजच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दीर्घकाळापासून रखडलेल्या विविध शासकीय महामंडळांच्या अध्यक्ष आणि सदस्य पदांचे अंतिम वाटप.
जिल्हा पातळीवरील नियोजन आणि इतर महत्त्वाच्या समित्यांचे महायुतीतील घटकांमध्ये वाटप.
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त ५ जागांबाबत अंतिम निर्णय.
आमदारांमधील आणि स्थानिक कार्यकर्त्यांमधील मतभेद मिटवून ताळमेळ बसवणे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर काय?
या प्रमुख मुद्द्यांवर आजच्या हायव्होल्टेज बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'त्या' कानमंत्राकडे सर्वांचे लक्ष
मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या बैठकीला महायुतीचे सर्व प्रमुख मंत्री, आमदार आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुका आणि अंतर्गत वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस महायुतीच्या नेत्यांना नक्की कोणता 'कानमंत्र' देतात आणि बैठकीतून कोणता मोठा राजकीय स्फोट होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.