ओंकार कदम, साम टीव्ही
साताऱ्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. सातारा-लोणंद मुख्य रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. मिनी ट्रॅव्हल्स बस इचलकरंजीहून उज्जैनला देवदर्शनासाठी निघाली होती. या दरम्यान, सालपे गावाजवळ हा भीषण अपघात घडला. अपघातग्रस्तांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. जखमींवर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोघांचा जागीच, एकीचा उपचारादरम्यान मृत्यू
या अपघातात ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तियाज सय्यद (वय वर्ष २४), तसेच रजनी संजय दुर्गुळे (वय वर्ष ४८, रा. पेठ वडगाव, ता. हातकणंगले) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.
अपघाताची घटना कुठे आणि कशी घडली?
इचलकरंजी येथून निघालेली मिनी ट्रॅव्हल्स बस उज्जैनकडे भाविकांना घेऊन जात होती. ही ट्रॅव्हल्स शनिवारी रात्री वाठार स्टेशन मार्गे सालपे घाट उतरत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की टेम्पो आणि ट्रॅव्हलरचे मोठे नुकसान झाले आणि अनेक प्रवासी जखमी झाले. या दुर्देवी अपघातात तिघांचा मृत्यू तर, आठ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामस्थांकडून मदतीचा हात
अपघातानंतर सालपे गावातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातस्थळी अपघातग्रस्तांच्या रक्ताचा सडा पडला होता. तसेच काही जण वाहनाच्या खाली अडकले होते. जखमींना तातडीने सातारा सिव्हिल रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू असून, पुढील तपास सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुशील भोसले करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.