संजय जाधव, साम टीव्ही
Samruddhi Mahamarg Vidarbha Travels Accident: समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला. या दुर्देवी घटनेत आतापर्यंत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. बुलडाण्याजवळील सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह (Police) स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसवरील आग नियंत्रणात आणली. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
अपघातग्रस्त ट्रॅव्हल बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण (Accident News) होता, की २५ प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाला. मृतांमध्ये महिला पुरूष तसेच लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.
दरम्यान, बस चालकासह बसमधील ८ प्रवाशी सुखरूप बचावले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत बसचालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बस ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जात होती.
१ जुलैच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास बस बुलढाणा येथील सिंदखेडराजा परिसरात आली. बसचा वेग जास्त असल्याने समोरील टायर फुटले. त्यामुळे बस थेट दुभाजकाला धडकली. क्षणार्धात बसने पेट घेतला. बस दरवाजाच्या दिशेने उलटल्याने बसमधून (Bus Accident) प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.
काही प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या. मात्र, गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या अपघातात चालकासह ८ जणांचे प्राण वाचले. या भयानक घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.