NCP Merger Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात अद्याप सुरूच आहे. दोन्ही गटांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. पण यावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेला दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजप दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण कधीच होऊ देणार नाही, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्याशिवाय आताच विलिनीकरणाची चर्चा का सुरू झाली? याचे कारणही त्यांनी सांगितलेय.
जोपर्यंत सुनेत्रा पवार निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत विलिनीकरण शक्य नाही, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. तर, आमच्याशी चर्चा केल्याशिवाय विलिनीकरण होणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. दुसरीकडे, असा कोणताही प्रस्ताव नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा संपल्याचे शरद पवार गटाने स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट हे भाजपची 'ए टीम' आणि 'बी टीम' आहेत. शरद पवार कधीही मोदी आणि अमित शहाने सांगितलेला एकही प्रश्न धुडकवू शकत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. भाजपच्या इशाऱ्यावर ते नाचतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नाही, असे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे.
विलिनीकरण केल्यानंतर विरोधी पक्षाची सरकार विरोधात आघाडी उभी राहतेय, त्यात खो घालणारा माणूस जातोय, हे भाजप कधी होऊ देणार नाही. सुनेत्रा पवार यांचे राजकीय वजन वाढायला लागले होते आणि त्या एकनाथ शिंदे सारख्या डोईजड होऊ नये म्हणून हा सर्व खेळ सुरु होता, असेही ते म्हणाले.
डिलिमिटेशनच्या बिलमध्ये सरकारने 50 टक्के किंवा 100 टक्क्याने जरी जागा वाढवल्या तरी जी लोकसंख्या कमी झाली आहे ती बदलू शकत नाही. दक्षिण भारतातील राज्यांची लोकसंख्या 15 टक्क्याने कमी झाली आहे, तर उत्तरेतील राज्यांची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे जागा वाढवून काही साध्य होणार नाही. लोकसंख्येचा असमतोल हा राहणारच आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
1997-98 मध्ये एका वर्तमानपत्रात उत्तर विरुद्ध दक्षिण भारत यावर एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात जी भीती दर्शवली होती, ते आज होतांना दिसतंय. या गंभीर विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांची प्रदीर्घ चर्चा झाली आहे ती चर्चा डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या खंडा मध्ये सविस्तरपणे आली आहे. 50 वर्षानंतर उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत हे विभाजन होणार नाही, हे सांभाळण्याची जबाबदारी ही सरकारची असेल, अशी अपेक्षा तेव्हा त्यांनी व्यक्त केली होती.
मुंबईमध्ये छट पूजेला शिवसेनेकडून याआधी ही विरोध झाला होता. ही छट पूजा मुंबईत का? हा त्या विरोधाचा सूर होता. आताही शिवसेना उबाठा, मनसेने त्याचा विरोध केलाय. आता त्या विरोधाची व्याप्ती वाढली आहे. आताचा विरोध हा भाषा आधारित होतोय. भाषा ही सुद्धा सब नॅशनॅलिटी आहे, हे आपण लक्षात घ्यावे. भावनेच्या आधाराला धरून भाषेचा प्रश्न उपस्थित केला जातोय. भाषेच्या आधारावर जगभरात राज्य, देश फुटले आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भाषेवरून द्वेषाची ठिणगी पाडणारे हे देशद्रोही आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांवर NSA कायद्या अंतर्गत कारवाई होणार कि नाही? याचा खुलासा भाजपने करावा. भाजपाने जर कारवाई केली नाही, तर भाजप स्वतःचा अजेंडा पुढे करण्यासाठी यांचा वापर करतंय हे स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.