महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आज जोरदार सरींचा अंदाज
परभणी, हिंगोली, नांदेडसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला विजांसह पावसाचा येलो अलर्ट
देशातील अनेक राज्यांत पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा
राज्यात गेले काही दिवस पावसाचा जोर ओसरलेला पाहायला मिळाला, मात्र आता पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींचा अंदाज असून, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः पावसाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव जाणवणार असून धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, महाराष्ट्राबरोबरच देशातील अनेक भागांत पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर आणि पश्चिम भारतासह ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सोमवारी देशातील किमान १५ राज्यांमध्ये पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिला आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.
दिल्लीमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज असून, पावसामुळे उकाडा आणि दमट हवामानापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांतही हलका ते मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत जोरदार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरच्या उंच भागातही पावसाची शक्यता असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.