जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीमध्ये साडेनऊ वर्षांच्या मुलीच्या हत्या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २५ वर्षीय तरुणाविरोधात १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करून खटला जलदगतीने चालवला जाईल, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली.
संदीप सिंह गिल म्हणाले, “२५ वर्षीय तरुणाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या साडेनऊ वर्षांच्या मुलीला पेरू खाण्याचे आमिष दाखवून ऊसाच्या शेतात नेलं. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला आणि सायंकाळी साडेसहा वाजता पोलिसांत तक्रार दिली."
गावातील नागरिकांकडे चौकशी केली असता ती संबंधित तरुणासोबत गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपासात तरुणाने मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचा गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलंय. संबंधित तरुणाला अटक करण्यात आली असून १५ दिवसांत आरोपपत्र न्यायालयात दाखल करून हा खटला जलदगतीने चालवणार असल्याची आम्ही ग्वाही देतो, असंही गिल म्हणालेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शेतमजुरीचं काम करतो. त्याचा शोध घेतल्यानंतर तो पिंपळवंडी परिसरात पोलिसांना सापडला. काही दिवसांपासून मुलीची तब्येत बरी नसल्याने ती शाळेत जात नव्हती, अशी माहितीही तपासात समोर आली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी फोनवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. प्रकरणाची अत्यंत पारदर्शक आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत सुनेत्रा पवार यांनी हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळिमा फासणारा असल्याचं म्हटलंय. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, आपण लवकरच पिंपळवंडीमध्ये जाऊन कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.