बीड : बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर चांगलंच टीकास्त्र सोडलंय. पंकजा म्हणाल्या, त्यांनी चिखल नाही, तर शेतकऱ्यांच्या भावना तुडवल्या आहेत. यांना इतका कशाचा आनंद झाला होता, की एकीकडं अतिवृष्टीने शेतकरी हतबल झाला असतांना दुसरीकडं मात्र, यांनी फटाक्याची आतिषबाजी करत मोठमोठे हार घालून परिवार संवाद यात्रेचे स्वागत केलं. असा ओंघळवाना प्रकार कुठं झाला नसेल तो इथं झाला. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडत, राष्ट्रवादीवर देखील हल्लाबोल केला.
जिल्ह्याची मान उंच करणारं काम करा, मी पाठीवर हात फिरवील बहीण आहे शाब्बासकी देईल, असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या बीडमध्ये आयोजित भाजपच्या आंदोलनात बोलत होत्या.
हे देखील पहा :
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या, ही मागणी घेऊन आज भाजप नेत्या पंकजा मुंडे खासदार प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कडून धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडले. तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर देखील सडकून टीका केली. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून यावर बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांचा चांगलाच समाचार घेतला. अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मोठमोठे गैरव्यवहार देखील केले जात आहेत. असा आरोप देखील त्यांनी केलाय.
त्या पुढे म्हणाल्या, की आमच्या जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून या राज्याचे सत्ताधारी स्वतःचे खिसे भरत असतील, माफियांना पोसत असतील तर आम्ही दुर्गेचा अवतार धारण करून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू.
आज पावणे दोन वर्ष होत आले सत्ता स्थापन होऊन आम्ही विचार केला की आल्या आल्या यांच्यावर टीकेची झोड नको व्हायला यांना थोडा वेळ दिला पाहिजे यांना पुढील काम करण्याची संधी दिली पाहिजे यामुळे सामान्य अशी भूमिका घेतली कारण विरोधीपक्षात असतांना हे इतके भाषण ठोकत होते, की मला वाटलं यांना काही मंत्रीपद मिळालं तर हे समाजाचं कल्याणचं करतील आणि खातंही तसच मिळालं, त्याच्यापुढं फक्त 'अ' लावायची वेळ आली आहे. म्हणजे समाज अकल्याण मंत्री अशा घटना माझ्या जिल्ह्यात घडत आहेत.
या बीड जिल्ह्याची बरबादी करण्यासाठी तुम्हाच्या हातामध्ये सत्ता दिलेली नाही. अधिकाऱ्यांना हाताशी धरून तुम्ही घोटाळे करता, अधिकाऱ्यांना हाताशी धरून तुम्ही लोकांची फसवणूक करता, स्वतःचे खिसे भरून तुम्ही अराजकता माजवून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. तर बीड जिल्ह्याची जनता हे कधीही सहन करणार नाही. किती खोट्या अट्रोसिटी केल्या, किती खोटे विनयभंगाचे गुन्हे दाखल केले. खरी ॲट्रॉसिटी, खरा विनयभंग याकडं कुणी लक्ष देत नाही. पोलीस स्टेशनसमोर एकमेकांना तलवारीने मारतात. काय धाक आहे आज प्रशासनाचा? आमच्या काळामध्ये असं करायची कोणाची हिंमत नव्हती कारण सर्वांना माहीत होतं, पंकजाताई कुणाला भक्षत नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे या बऱ्याच दिवसानंतर आक्रमक झाल्याचे पाहून, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.