नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड
नाशिकमधून एकाला ताब्यात घेतलं
नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांची चिंता वाढली
नीट प्रश्नपत्रिका हरियाणातून इतर राज्यांमध्ये पोहोचली
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्वाची असणारी नीट परीक्षा रद्द करण्यात आली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हा मोठा निर्णय घेतला. नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड झाले. या प्रकरणी नाशिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. संबंधित व्यक्तीला नाशिकच्या इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. हे संपूर्ण प्रकरणाची राजस्थान पोलिस आणि तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून संबंधित व्यक्तीबाबत अधिक तपास सुरू आहे.
३ मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर कठोर मेहनत घेत तयारी केली होती. परीक्षा पार पडल्यावर अनेक विद्यार्थी आपल्या गावी परत गेले आहेत. तर काही जण पालकांसोबत परदेश दौऱ्यावरही गेले आहेत. मात्र परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयानंतर आता पुढे काय होणार, पुन्हा परीक्षा कधी होणार, याबाबत विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
नीट परीक्षेच्या तयारीसाठी देशभरातील विद्यार्थी विविध राज्यांतून मोठ्या शहरांमध्ये येऊन कोचिंग क्लासेस घेत असतात. ३ मे रोजी परीक्षा झाल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकत आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला होता. काही विद्यार्थी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेले आहेत. मात्र परीक्षा रद्द झाल्याच्या बातमीमुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परीक्षा पुन्हा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. या पेपर फुटीमुळे या विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेच्या फुटलेल्या पेपरची पहिली प्रत नाशिकमध्ये तयार करण्यात आली होती. हिच प्रत हरियाणाला पोहचली. त्याठिकाणी या पेपरचे १० संच तयार करण्यात आले त्यानंतर ही फुटलेली प्रश्नपत्रिका हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि राजस्थानमध्ये पोहचली. या पेपर फुटी प्रकरणी राजस्थान पोलिस आणि तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, देशातील एकूण २२ लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. यामधील अडीच लाख विद्यार्थी महाराष्ट्रातील होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.