नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना आमदार नरहरी झिरवळ यांनी पाठिंबा दिला आहे. झिरवळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी अचानक ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
निवडणुकीत संदीप गुळवे यांचे काम करा, अशा सूचना नरहरी झिरवळ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे.
या मतदारसंघात विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, आज संदीप गुळवे यांनी नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. यानंतर नरहरी झिरवळ यांनी गुळवे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकीत त्यांचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, शिक्षक मतदारसंघात पक्षीय गणित बाजूला ठेवून पाठिंबा देत आहे. कौटुंबिक संबंधांमुळे संदीप गुळवे यांना आमचा पाठिंबा असेल, असंही झिरवळ यांनी म्हटलं आहे.
मी अजित पवार गटात नाराज नाही. आमचं सर्वकाही चांगलं सुरू आहे, असं स्पष्टीकरण देखील झिरवळ यांनी दिलं आहे. आधीच लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून महायुतीत वादाचे फटाके फुटत आहेत. त्यातच आता नाशिक शिक्षक मतदारसंघात झिरवळ यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिंदे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.