Maharashtra Political News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह राज ठाकरेंच्या मनसेलाही मोठा फटका बसत आहे. विशेष म्हणजे पक्षातील पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना नाशिकला धाडूनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
दुसरीकडे खुद्द राजपुत्र अमित ठाकरे नाशकात असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे शिंदेची शिवसेना दोन्ही ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. (Latest Marathi News)
महानगरपालिकेत सत्ता अर्धा डझनहून अधिक आमदार,खासदार,मंत्री अशी सगळी ताकत असलेल्या शिवसेनेसह कधीकाळी मनसेचा बालकिल्ला राहिलेल्या नाशिकच्या गडाला शिंदे गटाने भागदाड पाडल्यानं दोन्ही ठाकरेंच्या सेनेसमोर आव्हान उभ केलं आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेतील नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होत असल्याने ही शिंदेसेना दोनही ठाकरेंना भारी पडत असल्याचं सध्याचं चित्र आहे.
विशेष म्हणजे डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊतांसारखा शिलेदार पाठवूनही ठाकरे गटाला पडझड रोखण्यात यश आलं नाही. राऊतांची पाठ फिरताच माजी नगरसेवकांसह राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटाची वाट धरल्याने सेनेला मोठा फटका बसलाय.
तर दुसरीकडे खुद्द राजपुत्र अमित ठाकरे शहरात असताना नाशिकमधील मनसेच्या माजी नगरसेविकेसह पदाधिकाऱ्यांनीही रेल्वेइंजिनची साथ सोडत ढाल आणि तलवार हाती घेतली. विशेष म्हणजे दरवेळी अमित ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यावेळी होणारी कार्यकर्त्यांची गर्दीही यावेळी दिसली नाही.
अमित ठाकरे मनसे कार्यालयात उपस्थित असतांनाही बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते उपस्थित असल्यानं मनसेला नाशिकमध्ये नव निर्माणाची प्रतीक्षा कायम असल्याचंच चित्र पाहायला मिळालं. विशेष बाब म्हणजे कुणाच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडत नसल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलं असलं तरी आगामी काळात मनसेची शहरातील वाटचाल पूर्वी इतकी सोपी राहिलेली नाही.
कधीकाळी ३ आमदार, ४० नगरसेवक असा सुवर्ण काळ आणि भरभराट मनसेने नाशिकमध्ये पाहिलीय. तर उद्धव ठाकरेंच्या सेनेला महापालिकेत सत्ता,आमदार,खासदार अस मोठ बळ याच नाशिकने दिले होत.
मात्र आता या दोन्ही सेनांच्या बालेकिल्ल्यातील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे सेनेत दाखल झाल्याने दोन्ही ठाकरेंसमोर पक्षात नव संजीवनी फुंकण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेने उभं केलेलं हे संकट दोन्ही ठाकरे कसं परतवणार? हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.