sanjay bansode News: हत्तीबेटाचा पर्यटन विकास करताना आज तीन कोटी 29 लाख रुपये दिले असले तरी इथून पुढे या पर्यटन स्थळाला राष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी विकास केला जाईल, असे प्रतिपादन क्रीडा, युवक कल्याण आणि बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी केले. (Latest Marathi News)
हत्ती बेट येथील 3 कोटी 29 लाख रूपयाच्या विविध विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आज बनसोडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
हत्ती बेट लातूर जिल्ह्यातील पहिले ‘ब’ पर्यटन स्थळ आहे. याचा विकास करताना इथल्या लेण्या पर्यटकांना खुल्या करून देताना वेरूळ – अजिंठा सारखा आपल्याला विकास करायचा आहे. त्यासाठी त्याचा विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून करावा, अशा सूचना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष
हे वर्ष आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षे म्हणून साजरा करत आहोत. ज्या हत्ती बेटावर आपण आज विविध विकास कामं केली, तिथे किसान दलाने निजामाविरुद्ध युद्ध केलं आहे. रामघाट येथेही लढाई झाली होती. अशा महत्वाच्या पाऊल खुणा जिथे जिथे आहेत, तिथे कायमस्वरूपी त्या घटनांचे स्मरण होण्यासाठी काम करण्याच्या सूचना बनसोडे यांनी यावेळी दिले.
राज्यात ऑलिम्पिक भवन उभारणार
राज्याचा क्रीडा मंत्री झाल्यानंतर अनेक कामाला गती दिली असून पुण्याच्या बालेवाडीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ उभे राहत आहे. त्या विद्यापीठासाठी क्रीडा क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीला कुलगुरू म्हणून नियुक्त करणार आहोत. राज्याला पर्यायाने देशाला ऑलिम्पिक सारख्या जगविख्यात स्पर्धेत अधिकाधिक पदक मिळविणारे खेळाडू निर्माण व्हावेत, म्हणून हरियानाप्रमाणे ऑलिम्पिक भवन महाराष्ट्रात उभे करणार असून त्यासाठी 44 कोटी रुपये शासनाने मंजूर केले असल्याची माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी दिली.
तसेच ‘खेलो इंडिया खेलो’ स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वाधिक पदक मिळाले आहेत. त्यात अजून प्रगती व्हावी म्हणून ‘खेलो इंडिया अकॅडमी’ राज्यात उभी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.