सूरज मसूरकर, मुंबई प्रतिनिधी
एकनाथ शिंदेंनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी घेतले होते का? असा सवाल करत मनोज जरांगे यांनी भरपत्रकार परिषदेत ऑडिओ बॉम्ब टाकला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले गेले, तर सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तर देत जरांगे यांच्यावरच प्रश्न उपस्थित करण्यात आले. महायुतीमधील नेत्यांनी या प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यामध्ये शिंदे गटाकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. कथित ऑडिओमध्ये बोलणारी ती महिला कोण? भाजप आमदारांचीही नावे घेण्यात आली.. हा राजकीय स्टंट आहे का? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
शिंदे गटाच्या नेत्यांनी आज 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शिवसेनेकडून एक पत्र दिले. या शिष्टमंडळात विधान परिषद उपसभापती सचिन अहिर, खासदार मिलिंद देवरा, खासदार रवींद्र वायकर, माजी खासदार राहुल शेवाळे आणि माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा समावेश होता. या कथित ऑडिओ क्लिपची आता एसआयटी चौकशी होणार आहे. या प्रकरणामागे काही नियोजित कटकारस्थान आहे का, राजकीय हेतूने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे का आणि राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कुणाचा डाव आहे का, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविषयी एका महिलेने केलेल्या वक्तव्यांमागे त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र आहे का, तसेच त्या महिलेची पार्श्वभूमी आणि पुराव्यांची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या चर्चेदरम्यान भाजप नेते आमदार निरंजन डावखरे आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या नावांचा उल्लेख असल्यामुळे, असा काही प्रकार घडला होता का याबाबत त्यांच्याकडेही विचारणा व्हावी, असा मुद्दा उपस्थित केला आहे. चर्चेत अतुल, निखिल, श्वेताजी, गिरीष, अजयजी, जितेनभाई, सुशीलकुमार पावरा या नावांचा उल्लेख असून या व्यक्ती नक्की कोण आहेत आणि त्यांची राजकीय संलग्नता काय आहे, हे तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय - मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक व सायबर सेलमार्फत तपासणी करून सत्य समोर आणणे, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत.
माननीय मुख्यमंत्री महोदय,
आम्ही शिवसेनेचे खासदार, आमदार आणि राज्य सरकारमधील सहयोगी मंत्री या नात्याने एका अत्यंत गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन सादर करीत आहोत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण तातडीने निष्पक्ष व सखोल चौकशीचे आदेश द्याल, अशी आम्हाला खात्री आहे.
महोदय, आज, गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत एक कथित ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. ऑक्टोबर २०२४ मधील असल्याचे सांगितले जाणाऱ्या या क्लिपमधील संभाषणात शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्याविषयी केलेली कथित वक्तव्ये अत्यंत आक्षेपार्ह, बदनामीकारक आणि निंदनीय आहेत. या प्रकरणामागे काही नियोजित कटकारस्थान आहे का, राजकीय हेतूने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे का आणि राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कुणाचा डाव आहे का, याची सत्यता तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविषयी एका महिलेने केलेल्या वक्तव्यांची विशेष दखल घेणे गरजेचे आहे. संबंधित महिला कोण आहे, तिने कोणत्या आधारावर ही विधाने केली, तिच्याकडे याबाबत काही पुरावे आहेत का आणि तिला ही माहिती कोणी दिली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र यामागे आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे.
माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात या संभाषणात सहभागी व्यक्तींचा संबंध भाजपशी असल्याची चर्चा सुरू आहे; तथापि त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती आमच्याकडे नाही. मात्र, भाजपचे नेते आमदार निरंजन डावखरे आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या नावांचाही उल्लेख या चर्चेदरम्यान आहे. त्यामुळे असा काही प्रकार घडला होता का, याबाबत या नेत्यांकडेही विचारणा व्हावी.
या चर्चेत सहभागी असलेल्या व्यक्तींच्या नावांचा उल्लेख अतुल, निखिल, श्वेताजी, गिरीष, अजयजी, जितेनभाई, सुशीलकुमार पावरा असा केलेला आहे. या व्यक्ती नक्की कोण आहेत, त्यांची राजकीय संलग्नता आणि भूमिका काय आहे, हे तपासले गेले पाहिजे. महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बदनामी आणि सहकारी पक्षांविषयी अवमानकारक वक्तव्ये करण्याचे प्रयत्न जर होत असतील, तर संबंधितांना कोणतेही राजकीय संरक्षण मिळता कामा नये, ही आमची ठाम भूमिका आहे.
त्यामुळे या कथित ऑडिओ क्लिपची सायबर सेल आणि फॉरेन्सिक लॅबमार्फत तातडीने तपासणी करण्यात यावी. क्लिपची सत्यता, आवाजांची ओळख आणि संभाषणात काही फेरफार (Tampering) करण्यात आला आहे का, याची संबंधित व्यक्तींच्या आवाजाचे नमुने घेऊन शास्त्रीय पद्धतीने पडताळणी करण्यात यावी. चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही पूर्वग्रहदूषितपणे दोषी ठरवण्याचा आमचा हेतू नसून, सत्य कोणत्याही दबावाशिवाय समोर यावे हीच आमची प्रमुख मागणी आहे.
या कथित संभाषणातील वक्तव्यांमुळे मराठा समाजाची दिशाभूल झाली असेल किंवा भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याचीही गंभीर दखल घेतली पाहिजे. मराठा आरक्षणाच्या मागणीसारख्या संवेदनशील विषयाचा राजकीय हेतूंसाठी गैरवापर करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न खपवून घेता कामा नये.
सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे तसेच या संकटावर मात करणे ही प्रमुख आव्हाने राज्य सरकारसमोर उभी आहेत. अशा संवेदनशील काळात या क्लिपमुळे जातीय व सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमची आपणांस नम्र विनंती आहे कि, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने, निष्पक्ष आणि सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, तसेच कथित ऑडिओ क्लिपमध्ये निराधार विधाने करणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. आपण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ योग्य ती कार्यवाही कराल, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.