मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटींच्या व्यवहाराचा आरोप केल्यानंतर राजकारण तापलं असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच थेट प्रत्युत्तर दिलं आहे. ५०० कोटी दिले किंवा घेतलेही नाहीत. आरोप करताना जरांगेंनी शहानिशा करून घ्यायला हवी होती, असा सल्ला शिंदेंनी दिला.
मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात ५०० कोटींच्या कथित व्यवहाराबाबत दावा केला होता. या व्यवहाराबाबत सुरू असलेल्या चर्चेवर शिंदेंनी उत्तर द्यावं, असे जरांगे म्हणाले होते. जरांगेंच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी जरांगेंवर टीकास्त्र डागून आव्हान दिले होते. दुसरीकडे, शिंदेसेनेच्या काही नेत्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली होती. मात्र, शिंदेंकडून याबाबत दसरा मेळाव्याच्या भाषणात कुठलीही प्रतिक्रिया किंवा उत्तर देण्यात आले नव्हते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज, बुधवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत प्रश्न विचारल्यानंतर स्पष्ट उत्तर दिले. ५०० कोटी दिलेही नाहीत आणि घेतलेही नाहीत. आरोप करण्याआधी जरांगे यांनी त्याची खात्री करून घ्यायला हवी होती. त्यांच्याकडे पुरावे असतील तर संबंधित यंत्रणांकडे द्यावीत. चौकशी झाल्यानंतर सगळं स्पष्ट होईल, असे शिंदे म्हणाले.
मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्यानंतर राजकारण ढवळलं असून, एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी शिंदेंनी जरांगेंना सल्लाही दिला. जरांगे यांनी मराठा समाजाचे काम करावे. त्याला राजकीय व्यासपीठ करू नये, असे शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय दिला. आरक्षणाच्या माध्यमातून ५३०० पेक्षा अधिक जणांना नोकरीतील लाभ मिळाल्याचेही शिंदेंनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या विरोधकांसह खासदार संजय राऊत यांच्यावरही एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. कलम ३७० हटवण्यासारखे निर्णय घेणाऱ्या नेतृत्वावर सातत्याने आरोप करणे योग्य नसल्याचे शिंदे म्हणाले. सत्ता परिवर्तन जनता करत असते. त्यासाठी जनतेत जाऊन काम करावे लागते. घरात बसून सत्ता परिवर्तन होत नाही. जनतेने तुम्हाला तीन वेळा नाकारून तुमची जागा दाखवली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
देशात अराजक आणि अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत. हा नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका किंवा पाकिस्तान नाही; हा हिंदुस्थान आहे, असे शिंदे यांनी ठणकावून सांगितले. संविधान हातात घेऊन सर्वोच्च न्यायालयावर मोर्चे काढण्याची भूमिका योग्य नसून, देश तोडण्याऐवजी देश जोडण्याची भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.