रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
माणगाव नगर पंचायतीच्या माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश
आगामी निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला रायगडमध्ये धक्का
सचिन कदम, साम प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. सुनील तटकरे यांचे खंदे समर्थकांसह माणगाव नगर पंचायतीतील माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नाराज पदाधिकाऱ्यांच्या शिवेसनेच्या प्रवेशामुळे माणगावमधील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश झाल्यानं सुनील तटकरेंसह राष्ट्र्रवादीला मोठा धक्का मानला जातोय.
माणगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग आलाय. माजी नगरसेवक संदीप खरगटे, दिलीप जाधव, जयंत बोरडे, रत्नाकर उभारे, भाग्यश्री यादव आणि माजी उपनगराध्यक्ष निलिमा मेहता यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, सुनील तटकरे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांनी पक्ष सोडल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय.
दरम्यान, आगामी नगर पंचायत निवडणुकीत माणगाव नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या पक्षप्रवेशाचा आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या पक्ष प्रवेशावेळी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरेंवर टीका केलीय.
अजित पवार गट राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींवरून राष्ट्रवादीत मोठं भगदाड पडणार असल्याचा दावा दळवी यांनी केलाय. पुढील काही दिवसात कोकणातील राष्ट्रवादीमधील बडे नेते पक्षातून बाहेर पडणार असल्याचा दावाही दळवी यांनी केलाय.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून सुनील तटकरेंनी केलेल्या विधानांवरून दळवी यांनी तटकरेंवर टीका केली. राष्ट्रवादीमधील अनेक नेते पक्षाला रामराम ठोकणार आहेत, परंतु त्यांना शिवसेनेत प्रवेश करून घेऊ नये, असा सल्ला देखील आमदार दळवी यांनी भरत गोगावले यांना दिलाय. आता आमचा गिअर बदलला आहे, राजकारणात गिअर बदलावा लागतो. भरत गोगावले यांनी जरी गिअर बदलला नाही तर आम्ही नक्कीच गिअर बदलू. रायगड मधील पक्ष प्रवेशाची सुरुवात माणगाव मधून करतोय, असं आमदार दळवी म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.