अमरावती जिल्ह्यात भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
रामदास निस्ताने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश का केला?
प्रताप अडसड यांच्या मतदारसंघात भाजपला मोठा राजकीय धक्का
अमर घटारे, साम प्रतिनिधी
दिवाळीचा सण संपताच अमरावती जिल्ह्यातील राजकारणात मोठा धमाका उडालाय. गेल्या काही दिवसापासून भाजपमधील अंतर्गत वादाचे फटाके फुटत असतानाच जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसलाय.
भाजपचे आमदार आणि अमरावती जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड यांच्या मतदारसंघातील भाजपचे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती रामदास निस्ताने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.
रामदास निस्ताने यांच्या पक्षप्रवेशामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, निस्ताने यांच्यासोबत धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तालुक्यातील विविध गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
विशेष म्हणजे भाजपकडून संघटनात्मक ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू असताना आमदार प्रताप अडसड यांच्या मतदारसंघातच माजी पदाधिकाऱ्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं भाजपसमोर नवं आव्हान उभं राहिलंय. या पक्षप्रवेशाचा आगामी काळात धामणगाव रेल्वेतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान रामदास निस्ताने यांनी यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम सभापती, धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना योग्य मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप रामदास निस्ताने यांनी केला आहे. पक्षात जुन्या कार्यकर्त्यांची विचारपूस होत नसल्याने आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या संपूर्ण राजकीय हालचालींच्या केंद्रस्थानी 'रामदास' हे नाव चर्चेत आले आहे. "रामदास नावाचे वादळ मतदारसंघाच्या राजकारणात नवी समीकरणे जोडणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.