मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शेतकऱ्याच्या शेतातील पिकांची पाहणी केली. हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कळमनुरी शेत शिवारात गाड्यांचा ताफात थांबवत सोयाबीन पिकांची बारकाईने पाहणी केली आहे. हिंगोलीत संतोष बांगर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री आज हिंगोली दाखल झाले होते यावेळी त्यांनी पाहणी केली.
बांग्लादेशात हिंदू महिलांसह सर्व हिंदू बांधवांवर अत्याचार केले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले.
भारत सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून तिथे हिंदूना संरक्षण देण्याची मागणी
भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशवासियांना सरकारने तात्काळ परत पाठवावे.
त्याचबरोबर विशाळगडावर अतिक्रमण केलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुन्हा महिनाभर पुढे ढकलण्यात आलीय. १४ ऑगस्टला होणारी सुनावणी आता १७ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मागच्या अनेक महिन्यांपासून याप्रकरणी सुनावणी झालेली नाही.
पुढच्या काही दिवसात एक लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे. विरोधकांनी उद्योगाबाबतही फेक नरेटिव्ह केल्याचा आरोप, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला.
पुण्यातील मोदीबागेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले जात आहे. उद्घाटन प्रसंगी शरद पवार आणि आशिष शेलार एकत्र आलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पात्रताधारकांचं आंदोलन चिघळलं. आंदोलकांनी ठिय्या आणि रास्ता रोको केलाय. अचानक रास्ता रोको आंदोलनमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झालीय.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या घाटशेंद्रा परीसरात असणाऱ्या भंडार वाडी येथील गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी एकमेकाच्या तोंडाला चिखल लावत निषेध आंदोलन केलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. पावसाळ्यात हा रस्ता पूर्ण पाने चिखलमय होतो. त्यामुळे अनेकांना चिखलातून मार्ग काढात घर गाठावे लागत आहे. दरम्यान लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
१५ वर्षाच्या बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी
२६ आठवड्यांच्या अत्याचार पीडित गर्भवती मुलीच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालयात याचिका
उच्च न्यायालयाने गर्भपात करणे किंवा न करणे हे दोन्ही पर्याय न्यायालयाने मुलीसमोर ठेवले
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर झाली सुनावणी
रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. रवी राणा यांनी लाडक्या बहीण योजनेवर वक्तव्य केलं आहे. रवी राणा यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'महिलांना दिलेला पैसा यांच्या बापाचा आहे का? असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.
यवतमाळच्या बाभुळगांव नगर पंचायतीच्या एका रिक्त जागेसाठी काल मतदान झालं. यात एका जागेसाठी चार उमेदवार रिंगणात होते. आज मतमोजणी पार पडली. यात काँग्रेसचे अक्षर राऊत यांचा दणदणीत विजयी झाला. या निवडणुकीत भाजप दुसर्या तर शिवसेना ठाकरे गट तिसऱ्या आणि शिंदे गटाला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली.
राज्यात पानमांजर, गिधाड, रानम्हैससाठी प्रजनन केंद्र उभारण्यात येणार आहे. दुर्मिळ वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्यात येणार आहे. 'एक पेड माँ के नाम' उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ द्यावा, असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
नाशिक महापालिकेसमोर नागरिकांचं आंदोलन सुरू आहे. वडाला गावातील विविध समस्यांच्या प्रश्नावरून नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढलाय. रास्ता रोको आंदोलन केलंय. वडाळा परिसरातील वीज, पाणी, रस्त्यांच्या प्रश्नांकडे महानगरपालिकेच दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांनी आरोप केलाय. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक आक्रमक झालेत.
धडगाव नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक 14 मधील काँग्रेसचे पक्षाचे नगरसेविका बिना पावरा यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली.; त्यात काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत शिंदे गटाचे ममता पावरा यांना 358 मते मिळाली असून 93 मतांनी त्यांचा दणदणीत विजयी झाला. पुन्हा एकदा धडगाव नगरपंचायतीवर शिंदे गटाने आपला भगवा फडकवला असून अक्कलकुवा विधानसभा संपर्कप्रमुख विजयसिंग पराडके यांचा वर्चस्व पुन्हा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.
नागपुरातील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाडी ते हिंगण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील टोल वसुलीविरोधात मनसेच्या वाहतूक सेनेच्या पदाधिकारी यांनी तोडफोड केलीय. सोयी सुविधा मिळत नसताना टोल वसुली केली जात असल्याचा आरोप केलाय. आता तोडफोड केल्यानं वाडी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या सकाळी 10.30 वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. सरचिटणीस, सर्व राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेंनिथला बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी बाबत बैठकीत चर्चा होणार आहे. जातीय जनगणना आणि सुप्रीम कोर्टाने SC/ST बाबत दिलेल्या निर्णयावर देखील बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.
प्रतिनिधी रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्या संदर्भात रेल्वेच्या देशभरातील स्टेशन मास्तरांचा पॉवर डे देशभरातील ६८ रेल्वेच्या विभागीय कार्यालयावर होत आहे. या आंदोलनात रेल्वेचे सर्व विभागातील स्टेशनमास्तर सहभागी झाले आहेत. दरम्यान पुणे येथील विभागीय कार्यालयासमोर स्टेशन मास्तरांचे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनच्या वतीने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा महायुती समन्वयक पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झालीय. मंत्री अतुल सावे, खासदार डॉ भागवत कराड, आमदार संजय शिरसाट, आमदार योगेश टिळेकर, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बैठकीला आहेत. उदय सामंत थोड्याच वेळात येणार आहेत.
नाशिक महानगर पालिकेसमोर नागरिकांचे रास्तारोको आंदोलन. वडाला गावांतील विविध समस्यांबाबत नागरिकांनी राजीवगंधी भवन मोर्चा काढत रास्तारोको आंदोलन केले. लाईट पाणी रस्त्याकडे नाशिक महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त झालेत.
सोलापुरात मनपा आयुक्तांच्या गाडीवर भीम आर्मीने गटारीचे पाणी ओतले. मनापा आयुक्त शीतल तेली - उगले यांच्या गाडीवर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी गटारीचे पाणी ओतून निषेध व्यक्त केला. सोलापुरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर परिसरात ड्रेनेजचे पाणी शिरल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी. नड्डा १६ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नेते अतुल भोसले यांच्या मतदारसंघात भव्य जनसंवाद मेळावा होणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह इतर महायुतीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
पुण्यातील बार्टीबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या माध्यमातून पीएचडी अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आधिछात्रवृत्ती देण्यात येते. पण २०२२ मधील ७६३ विद्यार्थ्यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारची आधिछात्रवृत्ती देण्यात आली नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
पुण्यात भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर फेरीवाल्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्वला गौड, शरयू परब, हेमंत गायकवाड, राज निल, मुन्ना विठ्ठल गायकवाड, साक्षी गौड यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप खासदार अभिनेत्री कंगना रनौत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आङे. राहुल गांधी हा सर्वात धोकादायक माणूस असल्याची टीका कंगना रनौत यांनी केली. राहुल गांधी विषारी आणि विध्वंसक आहेत. त्यांचा अजेंडा आहे की जर ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत तर ते या देशालाही नष्ट करू शकतात, असे कंगना रनौतने सांगितले.
पुण्यात शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या मोदी बागेतील गेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. मोदी बागेसमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही या ठिकाणी जमा झालेले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विधानसभेच्या 288 जागांवर उमेदवार उभे करणार असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसापासून मार्केट आणि बाजारामध्ये भाजीपाल्यांची आवक घटली होती त्यामुळे दरात मोठी वाढ झाल्याने नागरिकांना आखडता हात घ्यावा लागला होता. मात्र याच भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने दरात आता मोठी घट झालीय .टोमॅटो मिरची, भेंडी, पालक, लिंबू आणि मेथीचे भाव स्वस्त झाल्याने भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी दिसून येत आहे. दरम्यान भाजीपाल्याचे दर कमी झाल्यामुळे सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे.
पुण्यात बनावट तिकिटाच्या माध्यमातून दोघांनी विमानतळात घुसण्याचा प्रयत्न केला. या दोघांनाही विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सलीम गोलेखान आणि नसरुद्दीन खान अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी करत मराठा आंदोलक पुण्यात दाखल झाले असून ते शरद पवार यांच्या मोदी बाग निवास्थानाबाहेर आंदोलन करणार आहेत. या आंदोलकांना शरद पवार भेटणार असून त्यांचं म्हणणं ऐकूण घेणार आहेत.
मुंबईच्या पवई परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पवईतील शिपिंग कंपनीच्या कार्यालयातून तब्बल २८५ सोन्याची नाणी चोरीला गेली आहेत. चोरी झालेल्या सोन्याच्या नाण्यांची किंमत ८० लाखांच्या घरात आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी पटियाला हाऊस कोर्टाने पूजाचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे तिला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. याविरोधात पुजाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे पूजा खेडकरला दिलासा मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती करण्यात येणार असून त्यासाठी आता 735 कोटी रुपयांचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच मंजुरी मिळेल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.
मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या दोन कालव्याची निर्मिती करण्यात आली.त्यापैकी डावा कालवा हा सुमारे 208 किलोमीटर लांब असून निर्मिती झाल्यापासून एकदाही दुरुस्ती झाली नव्हती.
दरम्यान डाव्या कालव्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यातील शेती पाण्याखाली येते त्यामुळे कालवा दुरुस्तीचा प्रस्ताव दिल्याने पाण्याची वहन क्षमता वाढू शकते आणि शेतकऱ्यांना अधिकचे पाणी मिळू शकेल.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. स्वत: संजय पांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची घोषणा केली आहे. वर्सोवा विधानसभेतून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. संजय पांडे यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.
रत्नागिरीतील गुहागर मध्ये पिंपर गावच्या परिसरात ब्लॅक पँथर आढळून आला. रस्त्याच्या लगत हा ब्लॅक पॅंथर जंगलाच्या दिशेने जात असताना काही नागरिकांनी पाहिला आणि त्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद केला. ब्लॅक पँथर हा तसा लाजाळू आणि निशाचर असल्याचे म्हटले जाते.
गुहागर तालुक्यात अनेकदा ब्लॅक पॅंथर चे दर्शन होत असते... पिंपळ मध्ये आढळून आलेला हा ब्लॅक पँथर बराच वेळ एकाच जागेवरती बसून राहिल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. वाघाच्या प्रजातीमधील ही जात असल्याचे देखील म्हटले जाते.
पावसाळ्यात कोकणातील जंगले घनदाट होत असतात आणि यामुळे अनेक दुर्मिळ प्राण्यांचे दर्शन पावसाळ्यात लोकांना होत असते. पिंपळ मार्गावरून जाणाऱ्या जंगली भागातून रस्त्यावरून अनेकदा अशा प्रकारचे प्राणी नजरेस येत असल्याचे देखील बोलले जात आहे. ब्लॅक पँथर अर्थात बगीरा याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.
अमरावतीच्या राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावरील एका स्पा सेंटरवर सिटी कोतवाली पोलिसांनी काल धाड टाकत स्पा भागीदारासह तीन तरुण व तीन तरुणींना ताब्यात घेतले. तेथे मसाजच्या नावावर देहविक्रीचा व्यवसाय व तरुणीईचे अश्लील चाळे सुरू असल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली होती. शहराच्या मध्यवस्तीत अशाप्रकारे सुरू असलेल्या अवैध धंद्यांबद्दल काही लोकप्रतिनिधींनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. या प्रकाराची चौकशी सिटी कोतवाली पोलीस करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.