कल्याण : कल्याण डोंबिवली (Dombivili) महानगरपालिका क्षेत्रात रिंग रोडमुळे १२०० झाडे बाधित होणार आहेत. त्यामुळे या १२०० झाडांच्या बदल्यात महानगरपालिकेने MMRDA च्या सहकार्याने कल्याण मधील आंबिवलीच्या 40 एकर परिसरात सुमारे 15000 हजार वृक्षांची लागवड करण्याचे ठरविले आहे.
सदर वृक्ष लागवड मोहीम जुलै 2018 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी, आयुक्त , महापौर , MMRDA चे अधिकारी आणि वनविभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली होती. वन विभागाने आंबिवली येथील टेकडी परिसरात महापालिकेत वृक्ष लागवडीसाठी दिलेल्या जागेवर आतापर्यंत करंजा, बहावा, जांभुळ, बदाम, आंबे, निलगिरी, गुलमोहर, पिंपळ, कडुलिंब, बकुळ, फणस, अर्जुन, कदंब, कैलास पती, वड ,उंबर अशा विविध प्रकारच्या भारतीय आणि दुर्मिळ झाडे लावली त्यामुळे आता आंबिवलीची टेकडी हिरवीगार झाली आहे.
आय नेचर फौंडेशनच्या सहकार्याने फुलपाखरू उद्यान , बी पार्क , बॅट पार्क, पक्षी पार्क , नक्षत्र उद्यान , मेडिसिनल पार्क उभारण्यात आली आहेत. तर या ठिकाणी आतापर्यंत ३६ प्रकारचे पक्षी , ७ प्रकारचे सरपटणारे प्राणी, ३५ प्रकारचे कीटक आणि ४ प्रकारचे सस्तन प्राणी आढळून आले आहेत. माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याच्या प्रेरणेतून आणि महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे अधिकारी संजय जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने साकारलेल्या जैवविविधता उद्यानाची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशातील इंदोर येथे दिनांक ५ व ६ ऑगस्ट रोजी जैवविविधता जतन या विषयावर पहिली राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या पहिल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये कल्याण डोंबिवली मधील आंबिवलीत गत तीन वर्षाच्या कालावधीत तयार झालेल्या जैवविविधता उद्यानाबाबत महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी देवलपल्ली यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अनुज्ञेने सादरीकरण केले. या सादरीकरणाची सर्व स्तरावर प्रशंसा झाली. महापालिकेच्या जैवविविधता उद्यानाबाबतचा लेखही या परिषदेत प्रकाशित करण्यात आलेल्या सेमिनार मध्ये प्रसिद्ध झाला आहे. महानगरपालिकेचा निधी खर्च न करता शहरी भागात साकारलेल्या या जैवविविधता उद्यानाची सदर परिषदेतील उपस्थितांनी दखल घेऊन कौतुक केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.