जळगाव : महावितरणने वीज ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग अचूक होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या तसेच वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास, मनस्ताप देणाऱ्या राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सींना महावितरणकडून (Mahavitaran) बडतर्फ करण्यात आले आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील २ तसेच औरंगाबाद, वसई, नांदेड व अकोला येथील प्रत्येकी एक अशा सहा मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गेल्या चार दिवसांमध्ये बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. (jalgaon news mahavitaran incorrect readings Towards six power meter reading agencies in the state)
बडतर्फ एजन्सीकडून वीज मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे, महावितरणला अचूक रीडिंग घेत असल्याची खोटी माहिती देणे आदी प्रकार होत असल्याचे दिसून आले. यामुळे महावितरणच्या (MSEDCL) महसुली नुकसानीसोबतच वीजग्राहकांनादेखील चुकीच्या वीजबिलांच्या दुरुस्तीसाठी मनस्ताप व त्रास झाल्याचे दिसून आले. त्याची गांभीर्याने दखल घेत याआधीच दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे महावितरणकडून मीटर रीडींग एजन्सीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर कंत्राटदारांना कामात कुचराई केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या एजन्सीवर कारवाई
एजन्सीने केलेल्या मीटर रीडिंगची पडताळणी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या पडताळणीमध्ये बारामती (Baramati) परिमंडलामधील परिमल एंटरप्रायजेस, पांडरे (ता. बारामती, सासवड विभाग) व गणेश एंटरप्रायजेस, सादलगाव (ता. शिरूर, केडगाव विभाग), कल्याण परिमंडलामधील सुप्रीम पॉवर सर्व्हीसेस, अंधेरी (वसई विभाग), नांदेड परिमंडलामधील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल, दहेली ता. किनवट (भोकर विभाग), औरंगाबाद परिमंडलामधील नंदिनी एंटरप्रायजेस (औरंगाबाद शहर विभाग २) आणि अकोला परिमंडलामधील अजिंक्य महिला बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था (अकोला शहर विभाग) या सहा एजन्सीद्वारे सुरू असलेल्या मीटर रीडिंगच्या कामात कुचराई होत असल्याचे आढळून आले. परिणामी या एजन्सीविरुद्ध थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.