Farmer Kailas Kuntewar Saam Tv
महाराष्ट्र

Farmer Story: KBC मध्ये ५० लाख जिंकले, पण दुष्काळानं हरवलं! छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

Farmer Story: KBC मध्ये ५० लाख जिंकणारे पैठण तालुक्यातील कैलास कुंटेवार यांनी शेतीत पैसा गुंतवला. मात्र, कोरडी विहीर आणि पिकांच्या नुकसानीमुळे त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

Shruti Vilas Kadam

Farmer Story: ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या लोकप्रिय कार्यक्रमात ५० लाख रुपये जिंकले, त्यामुळे आयुष्य बदलेल, अशी आशा निर्माण झाली. मात्र, यंदाच्या दुष्काळाने या स्वप्नांवर पाणी फेरलं. पैठण तालुक्यातील गावतांडा येथील शेतकरी कैलास कुंटेवार यांची ही कहाणी आहे. केबीसीमधून मिळालेला पैसा त्यांनी शेतीत गुंतवला, विहीर खोदली आणि कापूस-सोयाबीनची लागवड केली. मात्र, विहिरीला पाणी लागलं नाही, कापसाला बोंडं आली नाहीत आणि सोयाबीनचंही नुकसान झालं. त्यामुळे पदरात उत्पन्नाऐवजी निराशाच आली.

५० लाख जिंकले, शेतीत गुंतवले; पण पदरी निराशा

कैलास कुंटेवार यांच्याकडे अवघी दोन एकर शेती आहे. स्वतःच्या शेतात काम करण्यासोबतच ते दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. केबीसीमध्ये ५० लाख रुपये जिंकल्यानंतर आपल्या कुटुंबाचे दिवस बदलतील, अशी त्यांना आशा होती. याच पैशातून त्यांनी शेतीत गुंतवणूक केली आणि पाणी मिळावं म्हणून विहीर खोदली. मात्र, विहिरीला पाणी लागलं नाही. कापसाची लागवड करूनही बोंडं आली नाहीत, तर सोयाबीनच्या पिकातूनही अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळे शेतीत घातलेला पैसा वाया गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली रक्कम शेतीत गुंतवली, पण निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांचं आर्थिक गणित कोलमडलं.

शेतीत उत्पन्न नाही, कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा?

कैलास यांच्या कुटुंबात पत्नी, आई-वडील आणि मुलं आहेत. संपूर्ण कुटुंबाच्या अपेक्षा त्यांच्यावर आहेत. मात्र, शेतात उत्पन्नच मिळत नसेल, तर घरखर्च, मुलांचं शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागवायच्या कशा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. शेतीसाठी बियाणं, खतं, औषधं आणि इतर खर्च करावा लागतो. अनेकदा शेतकरी उसनवारी करून पीक उभं करतात. मात्र, पावसाने साथ दिली नाही आणि पाण्याची उपलब्धता झाली नाही, तर संपूर्ण मेहनत वाया जाते. कैलास यांच्याबाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर संकट

कैलास कुंटेवार यांची व्यथा ही केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाही. मराठवाड्यातील अनेक शेतकरी अनियमित पाऊस आणि पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. पीक हातातून गेल्यानंतर पुढील हंगामासाठी भांडवल उभं करणंही कठीण होत आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत, पाण्याचं योग्य नियोजन आणि पुढील हंगामासाठी आधार मिळणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्याला केवळ पेरणीच्या वेळीच नव्हे, तर पीक उद्ध्वस्त झाल्यानंतरही मदतीची आवश्यकता असते. केबीसीत ५० लाख जिंकूनही दुष्काळापुढे हतबल झालेल्या कैलास कुंटेवार यांची कहाणी मराठवाड्यातील शेतीसमोरील संकट अधोरेखित करते.'

Maharashtra News Live Update: खोपोली नगर पालिकेच्या प्रस्तावित जलसाठवण टाकीच्या जागेला पालकमंत्री भरत गोगावलेंनी दिली भेट

तुकाराम मुंढेंची दूध विक्री केंद्रांवर धडक कारवाई; ५६४ लिटर पांढरं विष नष्ट, दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Heart Attack Risk: कोलेस्ट्रॉल आणि बीपी नॉर्मल असतानाही येतोय हार्ट अटॅक! डॉक्टर म्हणाले, आधी तपासा 'ही' १ गोष्ट

पंतप्रधानांवर जादूटोणा? शेंदूरचं रिंगण अन् ९ लिंबू, धागे बांधलेले ४ नारळ; स्मशानभूमीजवळ सापडला मोदींचा फोटो

मांसाहारी पदार्थांची चव वाढवण्यासाठी हा सिक्रेट मसाला नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT