मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात आज सकाळी 4.5 तीव्रतेचा भूकंप.
सकाळी 9:16 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्याची प्राथमिक माहिती.
भूकंपाचे धक्के महाराष्ट्रातील जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांतही जाणवले.
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी नोंदवण्यात आली आहे. सकाळी 9 वाजून 16 मिनिटांच्या सुमारास हा धक्का बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भूकंपाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही जाणवला असून जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना सौम्य धक्के जाणवले.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ, रावेर, यावल, सावदा आणि जामनेर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. अचानक जमीन हादरल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांना घरातील वस्तू हलल्याचे जाणवले.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांतही भूकंपाचा परिणाम जाणवला. सकाळी 9 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले. त्यामुळे या भागातही काही काळ नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली.
मात्र, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि भूकंपाचे धक्के जाणवल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.