महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागत असतानाच पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अक्वान’ चक्रीवादळ अधिक तीव्र
चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता
राज्यात हळूहळू थंडीला सुरुवात होत असतानाच आता पावसाचेही संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अक्वान’ चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते. विशेषतः विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात सतत बदल होत आहेत. काही भागांमध्ये सकाळी आणि रात्री थंडी जाणवत आहे, तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम आहे. अशातच चक्रीवादळामुळे हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसेच कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहतील.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अक्वान’ चक्रीवादळ बुधवारी अधिक तीव्र झाले. हे वादळ आता पूर्व किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या वादळाचा परिणाम आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा धोका निर्माण झाला आहे.
या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवरही होऊ शकतो. विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांमध्ये शनिवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. एकीकडे राज्यात थंडी वाढण्याची अपेक्षा असताना दुसरीकडे चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.