संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी
Maharashtra Medical Registration Scam: परदेशातून वैद्यकीय शिक्षण (Medical Degree) पूर्ण करून आलेल्या बुलढाण्यातील दोन डॉक्टरांना महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (MMC) संकेतस्थळावर बनावट कागदपत्रे आणि एफएमजीई (FMGE) परीक्षेचे बोगस प्रमाणपत्र अपलोड करून अवैध नोंदणी केल्याचा गंभीर आरोप या दोघांवर आहे. डॉ. वरूण आखाडे आणि डॉ. संकेत उन्हाळे अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे असून पुढील चौकशीसाठी सायबर पोलिसांनी त्यांना मुंबईला नेले आहे.
काय आहे प्रकरण?
परदेशातून वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय (Medical Practice) करण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाची 'फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन' (FMGE) परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच संबंधित डॉक्टरांना भारतातील वैद्यक परिषदेत नोंदणी मिळते.
मात्र, महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या वेबसाईटवर तपासणी आणि चाचणी सुरू असताना २२ जणांच्या प्रमाणपत्रांवर संशय आला. या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यक परिषदेने तात्काळ महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
वेबसाईटवर अनधिकृत प्रवेश अन् बनावट नोंदणी
सायबर पोलिसांनी तपास केला असता, काही संशयितांनी एमएमसीच्या (MMC) संकेतस्थळावर अनधिकृत प्रवेश (Unauthorized Access) मिळवून बनावट प्रमाणपत्रे अपलोड केली आणि नोंदणी मिळवल्याचे उघड झाले. पोलिसांच्या सखोल चौकशीत बुलढाण्यातील डॉ. वरूण आखाडे आणि डॉ. संकेत उन्हाळे यांच्या कागदपत्रांमध्ये मोठी फेरफार आढळली.
या पुराव्यांच्या आधारे सायबर नोडल पोलिसांनी दोघांनाही अटक करून चौकशी सुरू केली आहे. या रॅकेटप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, उर्वरित १९ संशयित अद्याप महाराष्ट्र वैद्यक परिषद आणि सायबर पोलिसांच्या रडारवर आहेत. या कारवाईमुळे वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.