शिक्षेच्या भीतीने मुलाने अपहरणाचा बनाव रचला
एआयचा सल्ला नाकारून युट्यूबवरील क्राईम स्टोरीजवरून कथा तयार केली
सीसीटीव्ही तपासात मुलाने सांगितलेली घटना खोटी असल्याचे उघड
मोबाईल आणि सोशल मीडियाचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम
शुभम देशमुख, भंडारा
भंडाऱ्यात शाळेत झालेल्या वादातून शिक्षकांनी पालकांना बोलावण्याचे फर्मान सोडताच, एका ११ वर्षीय विद्यार्थ्याने जे पाऊल उचलले, ते पाहून संपूर्ण जिल्हा हादरला आहे. भीतीपोटी या मुलाने चक्क स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचून सर्वांनाच चक्रावून सोडले. या घटनेने मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर होणारे मानसिक परिणाम पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पवनी तालुक्यातील एका नामांकित शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. रागाच्या भरात या मुलाने फळ्यावर काही आक्षेपार्ह वाक्ये लिहिली. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी पालकांना शाळेत बोलावण्याचे ठरवले. घरी वडिलांची कडक शिस्त आणि शिक्षकांची भीती यामुळे हा मुलगा पुरता घाबरून गेला. काय करावे हे सुचत नसल्याने त्याने मदतीसाठी एआयचा वापर केला.
'एआय'ने त्याला चूक कबूल करण्याचा सल्ला दिला, परंतु शिक्षेच्या भीतीने त्याने तो धुडकावून लावला. त्यानंतर युट्युबवरील क्राईम स्टोरीज पाहून त्याने स्वतःच्या अपहरणाची थरारक कथा रचली. "अज्ञाताने चाकूचा धाक दाखवून अपहरण केले, रुमालाचा वापर करून बेशुद्ध केले आणि नागपूरच्या वाटेवर उमरेडजवळ मी पळून आलो," अशी खोटी माहिती त्याने आईला फोनवरून दिली.
मुलगा सुखरूप घरी आल्याने सुरुवातीला पालकांना दिलासा मिळाला, परंतु मुलाने सांगितलेल्या कथेतील विसंगतीमुळे त्यांना संशय आला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मुलाने सांगितलेली कोणतीही घटना घडल्याचे दिसून आले नाही. पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा करताच, मुलाने आपण भीतीपोटी हा सर्व बनाव रचल्याची कबुली दिली. केवळ एक साधी चूक पालकांना कळू नये म्हणून एका चिमुरड्याने इतक्या टोकाची भूमिका घेतल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विभक्त कुटुंब पद्धती, पालकांची धावपळ आणि मुलांशी होणारा तुटलेला संवाद यामुळे मुले एकलकोंडी होत आहेत. याच एकाकीपणाचा फायदा घेऊन मुले मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात आश्रय शोधत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.