Beed News Today: ऊसतोडीच्या उचलीचे पैसे बाकी राहिल्याचा दावा करत, चक्क ऊसतोड कामगारांच्या 6 चिमुकल्या मुलांना मुकादमाने डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूरच्या कुंभेज येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
तर करमाळा पोलीस आणि बालकल्याण समितीच्या मदतीने बीड जिल्ह्यातील असणाऱ्या, त्या सहा चिमुकल्या मुलांची सुटका करण्यात आली आहे. बीडमध्ये आणल्यानंतर त्या सहा मुलांना जिल्हा बाल समिती सदस्यांनी कुटुंबीयांकडे सुपुर्द केले आहेत. (Latest Marathi News)
बीडच्या (Beed) केज तालुक्यातील शिंदी गावातील एक ऊसतोड मजूर कुटुंब आणि गेवराई तालुक्यातील दोन कुटुंबे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. ऊसतोडणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर करमाळा येथील एका ऊसतोड मुकादमाने, मजुरांकडे पैसे शिल्लक असल्याचे म्हणत आणखी तीन महिने काम करावे लागेल, असे सांगितले.
त्यानुसार बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांनी तीन महिने काम केले. मात्र अद्यापही पैसे शिल्लक असल्याचा दावा मुकादमाने केला. पैसे द्या अन्यथा तुमची मुले आमच्याकडे ठेवा, असे सांगत त्या ऊसतोड मुकादमाने 3 मुले व 3 मुली करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे डांबून ठेवल्या. (Beed News)
या दरम्यान शांताबाई वसंत माळी यांनी सोलापूर येथील चाइल्ड लाइनला मुले डांबून ठेवल्याची माहिती दिली. त्यावरून चाइल्ड लाइनने ही माहिती सोलापूरच्या बाल कल्याण समितीला कळवली. समितीने करमाळा पोलिसांना याची माहिती देत त्या बालकांची सुटका करण्याचे आदेशित केले.
पोलिसांनी या चिमुकल्या बालकांची सुटका करून सोलापूर बाल कल्याण समितीपुढे सादर केले. तेथून केजच्या अमर पाटील यांनी त्या मुलांना बालकल्याण समितीच्या मदतीने बीडमध्ये आणले. त्यानंतर बालकल्याण समितीने त्या 6 चिमुकल्या बालकांना आई- वडिलांकडे सुपुर्द केले.
तर यावेळी घडलेली आपबिती सांगतांना ऊसतोड मजुराला अश्रू अनावर झाले. "तो सांगत होता, की आम्ही ऊसतोडीसाठी उचल घेतली. मात्र 6 महिने ऊसतोडणी करून ती आम्ही फेडली मात्र तरी देखील आमच्याकडे पैसे बाकी आहेत. अस मुकादम म्हणायचा म्हणून त्याने आम्हाला त्या ठिकाणी जबरदस्तीने ठेवलं. आम्ही 3 महिने पुन्हा काम केलं. मात्र तरी आमच्याकडे पैसे बाकी आहेत असं तो म्हणाला. मग त्याने आमच्या मुलांना त्याच्याकडे ठेवलं. असं म्हणत मला मुकादमाने खूप मारहाण केली असं सांगतांना ऊसतोड मजुराला अश्रू अनावर झाले.
दरम्यान बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यामध्ये ऊसतोड कामगारांचे ढीगभर नेते आहेत. मात्र आजही ऊसतोड मजूरांवरील अन्याय कमी व्हायचं नाव घेत नाहीत. पैशासाठी ऊसतोड कामगारांना खुलेआम डाबून ठेवलं जात आहे.
तर अनेकांचे खून देखील झाले आहेत. कित्येकांना जबर मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे ऊसतोड कामगार हा ऊसतोड मुकादम आणि कारखान्याच्या दहशतीत वावरत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. यामुळे आपल्या रक्ताची माणसं गावाकडे सोडून आलेल्या ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न हे सरकार सोडवणार का ? हाच खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.