अमर घटारे, अमरावती प्रतिनिधी
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या बहुचर्चित आणि चुरशीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून महायुतीचे (शिवसेना शिंदे गट) उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीत किरण सरनाईक यांनी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करत महाविकास आघाडीच्या (काँग्रेस) उमेदवार अदिती पोहरे यांचा पराभव केला.
दुसऱ्या पसंतीच्या मतांनी ठरवला विजय
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत विजयी घोषणेसाठी वैध मतदानापैकी १६,१३४ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला हा कोटा पूर्ण करता आला नव्हता. मात्र, दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीत किरण सरनाईक यांनी हा कोटा यशस्वीरीत्या पूर्ण करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
यापूर्वी २०२० च्या निवडणुकीत किरण सरनाईक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळवली. महायुतीच्या ताकदीच्या जोरावर आणि आपल्या वैयक्तिक जनसंपर्काच्या बळावर त्यांनी पुन्हा एकदा अमरावती शिक्षक मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
प्रथम क्रमांक (विजयी): किरण सरनाईक (महायुती - शिवसेना शिंदे गट)
द्वितीय क्रमांक: अदिती पोहरे (काँग्रेस - महाविकास आघाडी)
तृतीय क्रमांक: श्रीकांत देशपांडे (शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार)
विजयी ठरलेले किरण सरनाईक हे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मामेभाऊ आहेत, तसेच वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांचे मामा आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील त्यांच्या विजयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर शिंदे गटातील बंडखोरी मोडून काढत आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मागे टाकत किरण सरनाईक यांनी अमरावतीचा गड पुन्हा एकदा सर केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.