थंडीचे दिवस सुरू झाले की आपल्या रोजच्या सवयींमध्ये अनेक बदल होतात. सकाळी उशिरा उठणे, व्यायाम टाळणे आणि गरमागरम पदार्थ खाणे हे अनेकांच्या बाबतीत घडते. या दिवसांत चहा, कॉफी, भजी, वडापाव, पराठे आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा जास्त होते. विशेष म्हणजे, जेवण झाल्यानंतरही काही वेळातच पुन्हा भूक लागल्यासारखे वाटते. पण हिवाळ्यात खरंच शरीराला जास्त अन्नाची गरज असते का? की यामागे काही वेगळी कारणं आहेत? जाणून घ्या
आपल्या शरीरातील काही हार्मोन्स भुकेवर नियंत्रण ठेवतात. त्यामध्ये घ्रेलिन आणि लेप्टिन या दोन हार्मोन्सचा समावेश होतो. घ्रेलिनमुळे भूक लागते, तर लेप्टिनमुळे पोट भरल्याचा संकेत मिळतो. हिवाळ्यात झोपेच्या वेळा आणि रुटीन बदलल्यामुळे या हार्मोन्सच्या कामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही लोकांना वारंवार भूक लागते.
हिवाळ्यात दिवस लहान असल्याने सूर्यप्रकाश कमी मिळतो. याचा परिणाम झोप आणि मूडवर होऊ शकतो. सेरोटोनिन आणि मेलाटोनिन या रसायनांमध्ये होणारे बदल खाण्याच्या सवयींवरही परिणाम करतात. त्यामुळे या काळात गोड पदार्थ, भात, पोळी आणि इतर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. थंडीच्या दिवसांत गरमागरम आणि पोटभर जेवण करण्याची इच्छा होते. पराठे, भजी, समोसे, गुलाबजाम आणि हलवा यांसारखे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल वाढतो. मात्र अशा पदार्थांमध्ये कॅलरी आणि तेलाचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे वारंवार खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.
थंडीमुळे सकाळी फिरायला जाणे किंवा व्यायाम करणे अनेकजण टाळतात. घरात जास्त वेळ बसून राहिल्याने शारीरिक हालचाली कमी होतात. अशावेळी खाण्याचे प्रमाण मात्र वाढले तर शरीरात कॅलरी जमा होऊ शकतात. हिवाळ्यात आवडते पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र खाण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. आहारात डाळी, कडधान्ये, पनीर, अंडी, फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. घरच्या घरी योगा, चालणे किंवा हलका व्यायाम करा. थंडीमध्ये तहान कमी लागली तरी पुरेसे पाणी प्या. तसेच झोपण्याची आणि जेवणाची वेळ नियमित ठेवा. या छोट्या सवयींमुळे हिवाळ्यातही फिटनेस आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.