सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण महागड्या प्रोडक्टचा वापर करतात. विविध क्रीम, फेसपॅक आणि घरगुती उपायही केले जातात. मात्र त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केवळ बाह्य उपचार पुरेसे नसतात. शरीराला आतून योग्य पोषण मिळणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्वचेची लवचिकता आणि निरोगीपणा टिकवून ठेवण्यासाठी कोलेजन महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी शरीराला व्हिटॅमिन सी, अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन ई आणि झिंक यांसारख्या पोषक घटकांची गरज असते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी शरीरात कोलेजन तयार करतात. कोलेजनमुळे त्वचेची लवचिकता टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा निरोगी आणि घट्ट ठेवण्यासाठी आवळ्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
अंड्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारी सर्व नऊ प्रकारची अत्यावश्यक अमिनो अॅसिड्स आढळतात. याशिवाय अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी-१२ आणि कोलीनसारखे पोषक घटकही असतात. हे घटक शरीराच्या विविध कार्यांसाठी उपयुक्त असून त्वचेच्या आरोग्यालाही उपयुक्त ठरतात.
गाजर हे बीटा-कॅरोटीनचा उत्तम स्रोत आहे. शरीरात बीटा-कॅरोटीनचे रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये होते. व्हिटॅमिन ए त्वचेच्या पेशींचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियमित आणि संतुलित आहारात गाजराचा समावेश करावा.
बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. हे एक महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट असून त्वचेचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करण्यास मदत करते. तसेच त्वचेचे नैसर्गिक संरक्षणात्मक आवरण निरोगी ठेवण्यासही व्हिटॅमिन ई उपयुक्त ठरते. त्यामुळे मर्यादित प्रमाणात बदाम खाणे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक हे खनिज भरपूर प्रमाणात आढळते. त्वचेच्या पेशींची दुरुस्ती आणि त्वचेचे सामान्य कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी झिंक महत्त्वाचे आहे. भोपळ्याच्या बिया भाजून खाता येतात. तसेच सॅलड किंवा इतर पदार्थांवर टाकूनही त्यांचे सेवन करता येते.
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी केवळ सौंदर्यप्रसाधनांवर अवलंबून राहू नका. आवळा, अंडी, गाजर, बदाम आणि भोपळ्याच्या बियांसारख्या पोषक पदार्थांचा संतुलित आहारात समावेश करा. योग्य आहारासोबत पुरेसे पाणी, नियमित झोप आणि त्वचेची योग्य काळजी घेतल्यास त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.