संपूर्ण कपाळ दुखत आहे, फक्त डोळ्याच्या बाजूला वेदना होत आहेत किंवा डोक्यात टोचल्यासारखे वाटत आहे का? अशा लक्षणांवरून तुम्हाला कोणत्या प्रकारची डोकेदुखी आहे हे तुम्ही ओळखू शकता. कारण डोकेदुखी नेहमी फक्त सर्दी किंवा कडक उन्हामुळेच होत नाही. अति ताणतणाव, दैनंदिन जीवनशैली अनियमित झाल्यामुळे बायोलॉजिकल क्लॉक बिघडणे असे अनेक घटक डोकेदुखीला कारणीभूत ठरू शकतात. यामुळेच डोकेदुखीचे अनेक प्रकार असतात. या लक्षणांकडे लक्ष देऊन तुम्ही योग्य उपचारांद्वारे आराम मिळवू शकता.
माइग्रेनपासून ते क्लस्टर, साइनसाइटिस आणि टेंशन हेडॅक यांसारख्या डोकेदुखीच्या विविध प्रकारांबद्दल आणि त्या ओळखण्यासाठी कोणत्या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे हे जाणून घेऊया, तसेच डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा ह सुद्धा जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे.
माइग्रेन
पहिला प्रकार म्हणजे माइग्रेन. यात सामान्यतः डोक्याच्या एका बाजूला तीव्र आणि धडधडल्यासारख्या वेदना होतात, ज्या अनेक तास टिकू शकतात.काही व्यक्तींना डोकेदुखीसोबत मळमळ, उलट्या आणि प्रकाश किंवा मोठ्या आवाजाचा त्रास होऊ शकतो.
टेंशन हेडॅक
आजच्या काळात डोकेदुखीचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे टेंशन हेडॅक, म्हणजेच तणावामुळे होणारी डोकेदुखी. यामध्ये वेदनेसोबतच डोक्याभोवती आवळल्यासारखे किंवा दाब जाणवतो, जसे कोणीतरी डोक्यावर घट्ट पट्टी बांधली आहे.
क्लस्टर हेडॅक
लोक अनेकदा माइग्रेन आणि क्लस्टर हेडॅकबाबत संभ्रमात पडतात. क्लस्टर डोकेदुखीमध्ये डोळ्याच्या आसपास अचानक अतिशय तीव्र वेदना होतात. यासोबतच प्रभावित डोळ्यातून पाणी येणे, त्याच बाजूच्या नाकातून पाणी वाहणे यांसारखी लक्षणे दिसतात आणि डोळा लाल होऊ शकतो. क्लस्टर हेडॅकच्या काही रुग्णांमध्ये डोकेदुखीपूर्वी डोळ्यांसमोर चमकणारा प्रकाश दिसणे, अंधुक दिसणे किंवा हात-पायांना मुंग्या येणे अशी चिन्हे दिसतात.
साइनस हेडॅक
जेव्हा सायनासनच्या पोकळीत जळजळ किंवा संसर्ग होतो किंवा कफ साचतो, तेव्हा दाब वाढतो. या स्थितीला साइनसाइटिस म्हणतात. यामध्ये कपाळ, चेहरा किंवा डोळ्यांच्या आसपास दाबासह वेदना जाणवतात. काही प्रकरणांमध्ये नाक बंद होणे, वारंवार नाक वाहणे आणि गंध ओळखण्याची क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
या लक्षणांवर त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला
डॉक्टरांच्या मते, डोकेदुखी कपाळावर कोणत्या भागात होत आहे, त्याची तीव्रता किती आहे, वेदना किती वेळ टिकतात आणि दिवसातून किंवा आठवड्यातून किती वेळा होतात, या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल किंवा ती अचानक खूप तीव्रतेने सुरू झाली असेल, तर सावध व्हावे. यासोबतच बोलण्यात अडचण येणे, चक्कर सारखे वाटणे, अशक्तपणा, पाहण्यात अडचण यांसारखी लक्षणे दिसत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
टीप: या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.