आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे लिव्हर अर्थात यकृत. अन्न पचवण्यापासून ते शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत लिव्हर महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
लिव्हर स्वच्छ करण्यासाठी वेगळ्या डिटॉक्स ड्रिंक्सची गरज नसते. आपलं लिव्हर शरीरातील अनेक महत्त्वाची कामं नैसर्गिकरीत्या करत असतं. मात्र काही ड्रिंक्समधून शरीराला फायबर, जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडंट्स मिळू शकतात. हे घटक लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करू शकतात. डबल बोर्ड-सर्टिफाइड फिजिशियन आणि इंटरनल मेडिसिन आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ डॉ. जोसेफ सलहब यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये त्यांनी लिव्हरच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या काही पेयांची माहिती दिली आहे.
चिया सीड्स म्हणजेच सब्जासारख्या दिसणाऱ्या बिया आरोग्यासाठी उपयुक्त असतात. हे ड्रिंक तयार करण्यासाठी एक मोठा चमचा चिया सीड्स पाण्यात टाकून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्यात लिंबाचा रस घालून प्या. चिया सीड्समधून शरीराला फायबर मिळतं. यामुळे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाचं पोषण मिळण्यास मदत होते.
ब्लूबेरी हे फळ अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतं. त्यामध्ये अँथोसायनिन्स नावाचे घटक असतात. हे घटक शरीरातील पेशींचं संरक्षण करण्यास मदत करतात. याशिवाय केफिर हे आंबवलेल्या दुधापासून तयार होणारं ड्रिंक आहे. त्यातून प्रोटीन आणि चांगले बॅक्टेरिया म्हणजेच प्रोबायोटिक्स मिळतात.
डाळिंब आणि आलं यांचं मिश्रणही आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. डाळिंबामध्ये पॉलीफेनॉल्स नावाचे घटक असतात. हे घटक शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवण्यास मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे शरीरातील पेशींना नुकसान पोहोचू शकतं. आल्यामध्ये जिंजरॉल्स नावाचे घटक असतात. त्यांच्यात अँटिऑक्सिडंट आणि सूज कमी करण्यास मदत करणारे गुणधर्म असतात.
लिव्हरच्या आरोग्याबाबत कॉफीवर सर्वाधिक संशोधन झालं आहे. योग्य प्रमाणात कॉफी पिण्याचा संबंध लिव्हरमधील फायब्रोसिस, सिरोसिस आणि लिव्हरच्या कॅन्सरचा धोका कमी असण्याशी आढळून आला आहे. लिव्हर फायब्रोसिस म्हणजे लिव्हरमध्ये जखमेच्या जागी अतिरिक्त ऊती तयार होणं, तर सिरोसिसमध्ये लिव्हरला गंभीर स्वरूपाचं नुकसान होतं. कॉफीमध्ये कोको मिसळल्यास त्यातून फ्लॅव्हेनॉल्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स मिळतात. हे घटक शरीरातील पेशींचं संरक्षण करण्यास मदत करतात. मात्र, कॉफीमध्ये साखर आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात घालणं टाळावं.
कलिंगडामध्ये भरपूर पाणी असतं. याशिवाय त्यातून व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन हे घटक मिळतात. शरीराला पाण्याची कमतरता भासू नये आणि आवश्यक पोषक घटक मिळावेत, यासाठी कलिंगडाचा आहारात समावेश करता येतो. आल्यामध्ये काही नैसर्गिक घटक असतात, जे शरीरातील चयापचयाची प्रक्रिया चांगली ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे कलिंगड आणि आल्यापासून तयार केलेलं पेय हा आहारातील एक पर्याय ठरू शकतो.
ब्लॅक टीमध्ये थियाफ्लेव्हिन्स आणि इतर पॉलीफेनॉल्स असतात. हे घटक अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात आणि शरीरातील पेशींचं संरक्षण करण्यास मदत करू शकतात. ब्लॅक टीमध्ये पुदिना घातल्यास त्याची चव आणि सुगंध वाढतो. पुदिन्यामुळे अतिरिक्त साखर न घालताही चहा चविष्ट बनवता येतो. त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी ठेवायचं असल्यास हा पर्याय वापरता येऊ शकतो.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.