दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी रात्रीची शांत झोप महत्त्वाची असते. मात्र, झोपताना वापरली जाणारी उशीच जर कडक आणि सपाट झाली असेल, तर झोपेचा खोळंबा होऊ शकतो. जुन्या आणि दबलेल्या उशीमुळे सकाळी उठल्यानंतर मान आणि खांद्यांमध्ये वेदना तसेच आखडलेपणा जाणवू शकतो. अशावेळी अनेकजण नवीन उशी खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र, जुनी उशी लगेच फेकून देण्याची गरज नाही. काही सोप्या उपायांनी तिचा मऊपणा आणि फुगलेपणा पुन्हा मिळवता येऊ शकतो.
उशी सपाट होण्यामागे घाम आणि डोक्यामधील ओलावा हे एक कारण असू शकते. झोपताना शरीरातील ओलावा उशीमध्ये शोषला जातो. त्यामुळे आतील कापूस किंवा फायबर ओलसर होऊन सपाट होते. त्यामुळे उशी दबलेली आणि नरम होते. यासाठी आठवड्यातून किमान एकदा उशी २ ते ३ तास उन्हात ठेवा. त्यामुळे उशीतील ओलावा कमी होण्यास मदत होते आणि फायबर पुन्हा मोकळे होऊ शकते. उशीतील दुर्गंधी कमी होण्यासही याचा फायदा होतो.
उशी पुन्हा फुलवण्याचा हा एक सोपा आणि झटपट उपाय आहे. यासाठी उशी दोन्ही हातांनी पकडून तिच्या सर्व बाजूंनी हलके दाब द्या. पिठाचा गोळा मळल्याप्रमाणे उशीला हलक्या हातांनी मळा आणि थोपटा. तसेच उशी बेडवर ठेवून तिच्यावर हलक्या हातांनी थाप मारा. यामुळे आत एकाच ठिकाणी जमा झालेले फायबर किंवा कापूस मोकळा होण्यास मदत होते. परिणामी उशीचा फुगलेपणा काही प्रमाणात पुन्हा वाढू शकतो.
उशी खूपच कडक आणि सपाट झाली असेल, तर हा उपाय उपयोगी ठरू शकतो. यासाठी उशी वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये ठेवा. त्यासोबत दोन स्वच्छ टेनिस बॉल वेगवेगळ्या मोज्यांमध्ये ठेवून ड्रायरमध्ये टाका. ड्रायर १० ते १५ मिनिटांसाठी 'नो हीट' किंवा कमी तापमानाच्या सेटिंगवर सुरू करा. ड्रायर फिरताना टेनिस बॉल उशीला हलके धक्के देतात. त्यामुळे आत एकत्र झालेले फायबर मोकळे होण्यास मदत होते आणि उशी पुन्हा फुलू शकते.
ड्रायरमध्ये उशी टाकण्यापूर्वी तिच्या लेबलवरील धुण्याच्या आणि वाळवण्याच्या सूचना तपासा. प्रत्येक प्रकारची उशी ड्रायरमध्ये वापरण्यास योग्य असेलच असे नाही. तसेच, उशी फुलवण्याचे उपाय केल्याने मानदुखी बरी होईलच असे नाही. मानदुखी किंवा आखडलेपणा कायम राहिल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही उपाय करण्यापुर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.