Raavrambha Marathi Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raavrambha: ‘रावरंभा’ उलगडणार शिवचरित्र, दुर्लक्षित ‘प्रेम अध्याय’ १२ मे ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'रावरंभा' हा इतिहासाचा काहीसा दुर्लक्षित ‘प्रेम अध्याय’ १२ मे ला मराठी रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Raavrambha Marathi Film: हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ बांधताना छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे निधड्या छातीने लढणाऱ्या मावळ्यांची. ज्यांना फक्त एकच गोष्ट ठाऊक होती ती म्हणजे आपण ‘फकस्त लढायचं, आपल्या राजासाठी अन् स्वराज्यासाठी’. इतिहास नेहमीच शौर्याने, पराक्रमाने, तर कधी कधी अनेक षडयंत्रांनी तयार झालेला असतो. ऐतिहासिक काळातील महान व्यक्तिरेखांवर बेतलेले चित्रपट अलीकडच्या काळात आले आणि त्याला उदंड प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद ही मिळाला.

याच यादीत 'रावरंभा' चित्रपटाचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे. 'रावरंभा' हा इतिहासाचा काहीसा दुर्लक्षित ‘प्रेम अध्याय’ १२ मे ला मराठी रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे.

संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली रोमांचकारी प्रेमकथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अनेक प्रेमकथा गाजल्या. त्यांनी प्रेमासाठी केलेला त्याग, संघर्ष आपल्याला भावतो, अशा शौर्यवान, बुद्धिमान, पराक्रमी.. थोडक्यात हिमालयाएवढ्या व्यक्तिमत्वामागे उभ्या राहणाऱ्या स्त्रीलाही हिमालयाची सावलीच बनावं लागतं हे दाखवून देणारा शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित 'रावरंभा' हा चित्रपट याच यादीत येतो.

“ही प्रेमकथा आहे त्यागाची, समर्पणाची, प्रेमासाठी आणि स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावायला तयार असणाऱ्या पराक्रमी रावची आणि त्यासाठी झुरणाऱ्या रंभाची’. 'रावरंभा' यांची प्रेमकथा अतिशय सुंदररीत्या चित्रपटात गुंफण्यात आली आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा रोमहर्षक अनुभव असणार आहे. काही मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं आहे. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रती आणि स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला आहे.” असे दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात.

'रावरंभा' यांचं नुकतंच फुलत आलेलं प्रेम, त्यातच स्वराज्यावर चालून आलेलं संकट ‘राव’ कसा परतवून लावतो? हे दाखवताना ‘आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे ब्रीद मानणाऱ्या रावजीला आपल्या प्रेमासाठी कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागतं याची चित्तथरारक आणि रोमहर्षक कथा ‘रावरंभा’ चित्रपटातून उलगडणार आहे. ‘मुळशी पॅटर्न’मधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ओम भूतकर आणि सौंदर्यासोबत अभिनयाचा सुरेख मिलाफ असलेली गुणी अभिनेत्री मोनालिसा बागल या चित्रपटातून जोडीच्या रूपाने समोर येणार आहेत.

चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार असून यांच्यासोबत संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, मीर सरवर, किरण माने, रोहित चव्हाण, पंकज चव्हाण, अश्विनी बागल, मयुरेश पेम, अश्विनी बागल, विनायक चौघुले, शिवम देशमुख, कुणाला मसाले, आदर्श जाधव, रुक्मिणी सुतार, शशिकांत पवार आदि कलाकारांच्या ही भूमिका आहेत.

गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीतांना आदर्श शिंदे, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, रवींद्र खोमणे या गायकांचा स्वरसाज लाभला आहे. संगीतकार अमितराज यांनी ही सर्व गीते संगीतबद्ध केली आहेत. ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. देवी सातेरी प्रॉडक्शन्सचे प्रभाकर परब या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

सहनिर्माते डॉ. अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. १२ मे ला 'रावरंभा' ही ऐतिहासिक प्रेमकहाणी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT