Lawrence of punjab: OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या गुन्हेगारीवर आधारित कथा अनेकदा चर्चेचा विषय ठरतात; मात्र त्या कथा जर एखाद्या खऱ्या गँगस्टरच्या आयुष्यावर आधारित असतील, तर वाद अधिक वाढत जातो. सध्या ‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ या माहितीपटामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, रिलीजपूर्वीच हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ ही सिरीज २७ एप्रिल रोजी ‘ZEE5’ या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याआधीच पंजाब पोलिसांनी या माहितीपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे (MIB) मनाई हुकूम (injunction) जारी करण्याची विनंती केली आहे. पोलिसांच्या मते, या सिरीजमध्ये कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या आयुष्याचा आणि त्याच्याशी संबंधित गुन्ह्यांचा आढावा घेतला गेला आहे.
पोलिसांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, अशा प्रकारच्या आशयामुळे गुन्हेगारी कृत्यांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळू शकते. विशेषतः तरुणांवर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. गुन्हेगारीला सामान्य किंवा आकर्षक स्वरूपात दाखवले जाण्याची शक्यता असल्याने हा माहितीपट रोखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय, या सिरीजमध्ये काही हाय-प्रोफाइल गुन्हेगारी घटनांचा, त्यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचाही संदर्भ दिला गेला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनांचे नाट्यमय सादरीकरण केल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या संदर्भात सायबर गुन्हे विभागाचे पोलीस महासंचालक व्ही. नीरज यांनी अधिकृत पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) तरतुदींचा उल्लेख करत, संबंधित OTT प्लॅटफॉर्मवर हा माहितीपट प्रदर्शित होऊ नये, तसेच त्याचा ट्रेलरही प्रसारित करू नये, अशी मागणी केली आहे. इंटरनेटवरील आशयाचा समाजावर, विशेषतः तरुणांवर होणारा प्रभाव लक्षात घेता नियमनाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. परंतू, या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया किंवा भूमिका स्पष्ट केलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.