Hrithik Roshan: बॉलिवूडचा सुपरहिरो क्रिश पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. हृतिक रोशन अभिनीत ‘क्रिश ४’ ची घोषणा झाली असून, यावेळी एक खास ट्विस्ट असणार आहे. 'क्रिश ४' हा चित्रपट हृतिक रोशन स्वतः या दिग्दर्शित करणार आहे. ही माहिती हृतिकचे वडील आणि ‘क्रिश’ सिरीजचे निर्माते-दिग्दर्शक राकेश रोशन यांनी दिली आहे.
राकेश रोशन यांचे वक्तव्य
राकेश रोशन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'हृतिकने ‘क्रिश ४’ चे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. तो या चित्रपटात अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळणार आहे. आम्ही या चित्रपटाची कथा आणि पटकथा तयार करत आहोत, आणि हृतिकच्या दृष्टिकोनातून ही सिरीज पुढे नेण्याचा आमचा मानस आहे.' राकेश रोशन यांनी पुढे सांगितले की, 'हृतिक गेल्या काही वर्षांपासून दिग्दर्शनाच्या तयारीत होता आणि आता तो या नव्या आव्हानासाठी पूर्णपणे तयार आहे.'
‘क्रिश’ सिरीजचा प्रवास
‘क्रिश’ ही सिरीज २००३ मध्ये ‘कोई... मिल गया’ या चित्रपटाने सुरू झाली होती, या चित्रपटामध्ये हृतिकने रोहित मेहरा ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर २००६ मध्ये आलेल्या ‘क्रिश’ ने भारतीय सिनेमात सुपरहिरो चित्रपटांचा पाया रचला. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रिश ३’ ने बॉक्स ऑफिसवर २४० कोटींहून अधिक कमाई करत प्रचंड यश मिळवले. आता ‘क्रिश ४’ या चित्रपटाची तयारी सुरु आहे.
प्रदर्शनाची तारीख आणि निर्मिती
‘क्रिश ४’ च्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शन सुरू झाली आहे. राकेश रोशन आणि हृतिक रोशन यांच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे. काही अहवालांनुसार, २०२६ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
चित्रपटाची थीम
‘क्रिश ४’ ची कथा अद्याप गुलदस्त्यात आहे, परंतु सूत्रांच्या मते, या चित्रपटात अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अॅक्शन सीक्वेन्स असतील, त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन अनुभव मिळेल. हृतिकच्या चाहत्यांना त्याच्या सुपरहिरो अवताराबरोबरच त्याच्या दिग्दर्शनातील कौशल्य देखील पहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.