Diljit Dosanjh : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज हा आपल्या गाण्यांसोबतच बेधडक वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असतो. नुकताच त्याचा इंदौरमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट पार पडला. मात्र, या कार्यक्रमापूर्वी त्याला शो न करण्याच्या धमक्या देण्याचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली होती. अशा परिस्थितीतही दिलजीतने कोणाचीही भीती न बाळगता इंदौरमध्ये कॉन्सर्ट केला. विशेष म्हणजे, कॉन्सर्टच्या सुरुवातीलाच त्याने 'जय श्री महाकाल'चा जयघोष केला. यावेळी त्याने धमक्या देणाऱ्यांना आपल्या खास स्टाईलमध्ये सडेतोड उत्तर दिले. त्याच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
इंदौरमधील कॉन्सर्टची सुरुवात दिलजीतने 'जय श्री महाकाल'च्या घोषणेने केली. त्याने उपस्थित चाहत्यांकडूनही जय श्री महाकालचा जयघोष करून घेतला. यावेळी बोलताना तो म्हणाला की, ही महाकालाची भूमी आहे. त्यामुळे आपल्याला इथे येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यावेळी त्याने धमक्या देणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत त्याने सांगितले की, "मी घाबरत नाही. ना आम्ही आधी घाबरलो आणि ना आज घाबरत आहोत." यानंतर त्याने उपस्थित चाहत्यांनाही तुम्ही घाबरता का? असा प्रश्न विचारला. चाहत्यांनीही मोठ्या उत्साहात त्याला प्रतिसाद दिला.
दिलजीतने यावेळी इंदौरमध्ये कार्यक्रम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याचाही उल्लेख केला. मात्र, चाहत्यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आपण इथे आल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, एकदा कोणाला शब्द दिला की आपण मागे हटत नाही. अनेक धमक्या मिळाल्यानंतरही आज आपण इथे उभे आहोत, असेही त्याने स्पष्ट केले.
कॉन्सर्टदरम्यान दिलजीतने प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे काही शेरही सादर केले. तो म्हणाला, 'हमारे मुंह से जो निकले वही सदाकत है, हमारे मुंह में तुम्हारी जुबान थोड़ी है; अगर खिलाफ हैं तो होने दो, जान थोड़ी है; सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है।'
दरम्यान, दिलजीतच्या कार्यक्रमामुळे इंदौरमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. महापौर कार्यालय, तीन बँका आणि तीन खासगी शाळांना धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात या धमक्या बनावट असल्याचे समोर आले. तपासादरम्यान हे ई-मेल देवास येथील एका व्यक्तीच्या हॅक झालेल्या ई-मेल खात्यातून पाठवण्यात आला होता. हा ई-मेल या वर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये हॅक झाल्याची माहितीही समोर आली. लॉग-इन रेकॉर्ड तपासताना अमेरिकेतील संशयास्पद आयपी अॅड्रेस आढळला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दिलजीतच्या बेधडक वक्तव्याने कॉन्सर्टची चर्चा आणखी रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.