मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी रविवारी (०७ जानेवारी) उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते आणि शिवसेना (उबाठा) किरण माने यांच्या हातात शिवबंधन बांधत आणि पक्षात स्वागत केलं. नुकतंच अभिनेता किरण माने यांनी फेसबूकवर पोस्ट करत पक्षप्रवेशावेळी मातोश्रीवर नेमकं काय घडलं?, याविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "...किरणजी, तुमचे लेख मी वाचलेत. फार छान लिहिता. उद्धवजी येतील थोड्या वेळात, तुम्ही आधी नाष्टा-चहा करून घ्या. रिलॅक्स व्हा. हे तुमचंच घर आहे." रश्मी वहिनींनी स्वागतच असं केलं की, 'मातोश्री' विषयी मी कॉलेज जीवनापास्नं ऐकलेल्या अनेक गोष्टी झरझरझरझर डोळ्यांसमोरून जाऊ लागल्या. अमिताभ बच्चनपासून दादा कोंडके, नाना पाटेकरांपर्यंत अनेकांनी मीनाताई ठाकरेंच्या आदरातिथ्याबद्दल अनेक मुलाखतींमधून सांगितलेल्या अनेक गोष्टी माझ्या मेंदूत कोरलेल्या आहेत. अगदी तस्संच आदरातिथ्य रश्मीवहिनी करत होत्या."
"आम्ही भरभरुन गप्पा मारल्या. मी विचार करत होतो, गेल्या दोन- तीन वर्षांत हे कुटूंब अनेक जिवघेण्या आघातांमधनं गेलंय. जवळच्यांनी, रोज या घरात वावरणार्यांनी केलेले ते घाव अजूनही ओले आहेत. वेदना होत असणार. तरीही या माऊलीच्या चेहर्यावरचं हास्य जराही मावळलेलं नाही. सगळं दु:ख पचवून चेहरा प्रसन्न ठेवायला जिगरा लागतो. माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं. गेली चार दशकं 'मातोश्री' या वास्तूचं आकर्षण अख्ख्या महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला 'मातोश्री' हा अजिंक्यतारा आहे, हे विरोधकही नाकारणार नाहीत ! मुंबईत भले कितीही उंच टॉवर्स उभे राहोत, 'मातोश्री'पुढे सगळं खुजं आहे."
"मला बहिणीसारख्या असलेल्या सुषमा अंधारेताईंनी 'मातोश्री'वर बोलावले तेव्हापासून काळीज धडधडायला लागलं होतं! सुषमाताई म्हणजे मायेची सावली. दोन वर्षांपूर्वी माझ्यावर जो मोठा आघात झाला होता, तेव्हा ओळख नसतानाही स्वत:हून फोन करुन भेटून, मला न्याय मिळावा म्हणून माझ्यासाठी जीवाचं रान केलेले जे दोनचार लोक होते, त्यांपैकी एक सुषमाताई. त्याविषयी सविस्तर लिहीन नंतर. पण त्यासोबत असल्यामुळे एक दिलासा होता. उद्धवजी आले. सोफ्यात बसले. मनात आलं, इथेच कधीकाळी बाळासाहेब ठाकरे बसत असतील ! 'कधी आलात किरणजी?' उद्धवजींच्या प्रश्नानं भानावर आलो. चर्चा सुरू झाली. मी मुद्दाम ठरवून प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारधारेचा विषय काढला. त्यावर उद्धवजी इतके सविस्तर बोलले की मी अवाक झालो. त्यांच्या विचारांचा सगळा अर्क उद्धवजींच्या नसानसात आहे, हे जाणवलं."
"प्रबोधनकारांची, शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकरांसोबतची एक दादरच्या गणेशोत्सवातली आठवण जेव्हा उद्धवजींनी सांगितली. तेव्हा मनाशी म्हटलं, 'ये वजह है के ये बंदा अभी भी डटकर खडा है!' काही वेळा राजकारणात काही गोष्टींत तडजोडी कराव्या लागतात, त्या पूर्वी त्यांनी केल्याही असतील... पण आता संविधान पोखरून समोर जो विषमतेचा, अन्यायाचा, अराजकाचा दहशतीचा अक्राळविक्राळ राक्षस उभा राहिला आहे, त्याची पुरेपुर जाणीव असलेले देशात जे आठदहा नेते उरले आहेत... त्यातले एक उद्धवजी ठाकरे आहेत, हे नक्की! बास. आणखी काय पाहिजे? आता एक होऊन लढायचं. बाकी बारीकसारीक मतभेद सगळीकडेच रहाणार. ध्येय फिक्स झालंय ना? विषय कट."
"बाकी सविस्तर बोलत राहीन. पण फिकीर करू नका भावांनो, ह्यो सातारी वाघ मागं हटनार नाय. आपली विचारधारा ह्यो आपला 'नाद' हाय. त्यो कुटं जात न्हाय. शिवसेना आपलीशी केलीय. आता उतनार नाय, मातनार नाय... घेतला वसा टाकनार नाय. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र"
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.