सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परताव्यासाठी एफडी हा नेहमीच ज्येष्ठ नागरिकांचा आवडता पर्याय राहिला आहे. अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, सरकारी आणि खासगी बँका ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक व्याजदर ऑफर करत असून, काही बँकांमध्ये एफडीवर चांगल्या टक्केवारी व्याजदर परतावा मिळणार आहे. आपल्या कष्टाच्या पैशांवर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी सरकारी आणि खासगी बँकांचे ताजे व्याजदर दिले आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी) फिक्सड डिपॉझिट (FD) वर चांगला परतावा मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ८.५ टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज मिळत असून, यामध्ये स्मॉल फायनान्स बँका आघाडीवर आहेत. सेवानिवृत्तीनंतर ज्यांना आपल्या बचतीवर सुरक्षित आणि नियमित परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी बँकांच्या व्याजदरांची ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
लाईव्ह हिंदुस्थान'च्या रिपोर्टनुसार, सरकारी बँकांमध्ये बँक ऑफ इंडिया ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक ७.४५ टक्के वर्षाला व्याज देत आहे.
पंजाब अँड सिंद बँकेत कमाल व्याजदर ७.३५ टक्के, तर बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये हा दर ७.२५ टक्क्यांपर्यंत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन बँकेत कमाल व्याजदर ७.१५ टक्के इतका सांगितला आहे.
याशिवाय, इंडियन बँकेने नुकत्याच ५५५ दिवस आणि ७७७ दिवसांच्या ‘इंड ग्रो’ व ‘इंड प्रॉस्पर’ एफडी योजनांच्या व्याजदरात वाढ केली असून, त्यावर ज्येष्ठ नागरिकांना अनुक्रमे ७.३० टक्के आणि ७.२५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे.
तसेच इंडियन ओव्हरसीज बँक, केनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँकेत कमाल व्याजदर ७.१० टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि युनियन बँकेत ७.०५ टक्के, तर युको बँकेत ६.९५ टक्केपर्यंत परतावा मिळत आहे.
दुसरीकडे, रिपोर्टनुसार खासगी बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना अधिक आकर्षक परतावा मिळत असून, यामध्ये एसबीएम बँक सर्वात पुढे आहे आणि तिथे ज्येष्ठ नागरिकांना कमाल ८.१५ टक्के वर्षाला व्याजदर मिळत आहे.
डीसीबी बँकेत कमाल व्याजदर ८ टक्के, बंधन बँकेत ७.९५ टक्के, तर धनलक्ष्मी बँक, इंडसइंड बँक आणि येस बँकेमध्ये ७.७५ टक्क्यांपर्यंत कमाल व्याजदर दिला जाणार आहे.
गुंतवणुकीसाठी केवळ एफडीवरील सर्वाधिक व्याजदर हाच एकमेव आधार असू नये. ज्येष्ठ नागरिकांनी बँकेच्या अटी, मुदतपूर्व एफडी मोडल्यास लागणारा दंड, व्याज देण्याचे पर्याय आणि ठेव विमा मर्यादा यांचाही आढावा घ्यावा. डीआयसीजीसीच्या नियमांनुसार, ठेवीदाराची मुद्दल आणि व्याज कमाल ₹५ लाखांपर्यंत ठेव विमा संरक्षणाखाली येते. हे व्याजदर २१ ऑक्टोबर २०२६ रोजी उपलब्ध असलेल्या दरांवर आधारित असून, ते ₹३ कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडींना लागू होतात. गुंतवणूक करण्यापूर्वी, संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दरांची पडताळणी जरुर करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.