Ladki Bahin Yojana July 1500 installment payment updat : राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे (DBT) जमा होण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाचे औचित्य साधून महायुती सरकारकडून राज्यातील लाडक्या बहिणींना ही विशेष भेट देण्यात आली आहे.
१ कोटी ६६ लाख पात्र महिलांना मिळणार लाभ
लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. मंगळवारी रात्रीपासूनच पुणे, सोलापूर, बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यात सन्माननिधी जमा झाल्याचे संदेश प्राप्त झाले आहेत. तांत्रिक प्रक्रियेनुसार पुढील २ ते ३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न (Aadhaar Linked) बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याचा बॅलेन्स तपासून याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई-केवायसी (e-KYC) नंतर ९२ लाख महिला अपात्र
या योजनेसाठी अर्ज प्रक्रियेनंतर करण्यात आलेल्या कसून छाननी आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर पारदर्शकता आणण्यात आली आहे. या पडताळणी प्रक्रियेत सुमारे ९२ लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवळ नियम व अटींची पूर्तता करणाऱ्या पूर्णतः पात्र १ कोटी ६६ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यातच हा निधी वितरित केला जात आहे.
जुलै आणि ऑगस्टच्या एकत्रित हप्त्याची चर्चा थांबली
ऑगस्ट महिना संपण्यासाठी अवघा आठवडा शिल्लक राहिल्याने, महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित ३००० रुपये मिळणार की केवळ एकाच महिन्याचा हप्ता जमा होणार, याबाबत महिला वर्गात मोठी उत्सुकता आणि चर्चा सुरू होती. मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की, सध्या वितरित करण्यात येत असलेला हप्ता हा केवळ जुलै महिन्याचा (१५०० रुपये) आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे ट्विट
या महत्त्वपूर्ण घडामोडीची अधिकृत माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत दिली.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट: जुलै महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू! रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे."
त्यांनी पुढे नमूद केले की, महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यशस्वीपणे पुढे जात आहे. रक्षाबंधनानिमित्त मिळालेल्या या आर्थिक पाठबळामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.